Join us

Lockdown : महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊनचा 'कॅबिनेट निर्णय', लवकरच घोषणेची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 6:36 PM

मंत्रिमंडळ बैठकीत आज सर्वच सदस्यांनी कोरोनाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊनची महत्त्वाची मागणी केली. राज्यात कडक लॉकडाऊनची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमंत्रिमंडळ बैठकीत आज सर्वच सदस्यांनी कोरोनाला आळा घालण्यासाठी  लॉकडाऊनची महत्त्वाची मागणी केली. राज्यात कडक लॉकडाऊनची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबई - राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारनं निर्बंध आणखी कडक केले आहेत. राज्यात आज रात्री ८ वाजल्यापासून ते १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत नवे नियम लागू असणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर, आता राज्यात लवकरच संपूर्ण लॉकडाऊन जाहीर होणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात माहिती दिली. तसेच, मंत्री अस्लम शेख यांनीही संपूर्ण लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. 

राज्यातील सर्व किराणा, भाजी दुकाने, फळ दुकाने , डेअरी, बेकरी, कनफेकशनरी, सर्व खाद्य दुकाने ( चिकन, मटन, पोल्ट्री , फिश सह ), कृषि उत्पादनशी संबंधित दुकाने, पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने, येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने ही दररोज सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेतच सुरू राहतील. त्यानंतर संपूर्ण दिवसभर ही दुकानं बंद राहणार आहेत. मात्र, या दुकानांना सकाळी ७ ते रात्री ८ यावेळेत होम डिलिव्हरी करता येईल, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानंतर, आता राज्यात कडक लॉकडाऊन जाहीर होणार असल्याचं निश्चित झालंय. त्यादृष्टीने सरकारची वाटचाल सुरू असल्याचं अस्लम शेख यांनी मीडियाशी बोलताना म्हटलंय.

मंत्रिमंडळ बैठकीत आज सर्वच सदस्यांनी कोरोनाला आळा घालण्यासाठी  लॉकडाऊनची महत्त्वाची मागणी केली. राज्यात कडक लॉकडाऊनची गरज व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, ट्रेन बस पूर्णपणे बंद केल्या तर अत्यावश्यक सेवांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यावर आज आणि उद्या काळजीपूर्वक अभ्यास करून निर्णय घेतला जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगतिलं. यापूर्वी आम्ही लॉकडाऊन हा शब्द वापरला नव्हता. आता, मुखमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊबाबतचा निर्णय घेतला आहे. पण, त्यासंदर्भातील घोषणा मुख्यमंत्री स्वत:च करतील, असेही टोपे यांनी सांगितले.

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही राज्याची वाटचाल ही कडक लॉकडाऊनच्या दिशेनं आहे. ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत असल्याने लवकरच लॉकडाऊनची घोषणा होईल, असे अस्लम शेख यांनी म्हटलंय. 

15 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज - शिंगणे

राज्यात कडक निर्बंध लादण्यात आले असले तरी लोकांमध्ये गांभीर्य दिसून येत नाही. त्यामुळे, राज्यात कडक लॉकडाऊन लावण्यासंदर्भातही राजेंद्र शिंगणे यांनी सकारत्मकता दर्शवली आहे. पूर्वीप्रमाणेच राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याची गरज असल्याचं मी मुख्यमंत्र्यांशी फोनवर केलेल्या चर्चेत म्हटलं. आरोग्य यंत्रणेंवर सर्वात मोठा ताण येत आहे. मात्र, रुग्णांची संख्या कमी होत नाही. त्यामुळे, रुग्णसंख्या कमी करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात यावा, अशी आपली वैयक्तिक भूमिका असल्याचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे.           कोरोनाची तिसरी लाट येणार - हसन मुश्रिफ

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र कोरोनाची तिसरी लाट ही येणार आहे, असे तज्ञ सांगत असून सर्वांनी एकत्रपणे कोरोनाचा सामना करणे गरजेचे आहे. सरकार ही आपल्या माध्यमातून सर्व उपाययोजना करत असून, पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक भयानक आहे. मात्र, सरकार योग्य सामना करेल आता माणसे जगवणे हीच आमची प्राथमिकता असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसराजेश टोपे