Uddhav Thackeray: लॉकडाऊन करावा लागू शकतो, मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना फोन; मनसेनेही तात्काळ केलं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 04:19 PM2021-04-04T16:19:39+5:302021-04-04T16:37:03+5:30
उद्धव ठाकरेंनी बैठकीआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत देखील (Raj Thackeray ) फोनवरुन चर्चा केली.
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मुंबईसह राज्याबाबत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. आज संध्याकाळीच याबाबतची नवी गाईडलाईन जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यात लॉकडाऊन लागू होणार की कठोर निर्बंध जाहीर होणार? याकडे संपूर्ण राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी ३ वाजता मंत्रिमंडळाची बैठकीला सुरुवात झाली. दूरदृश्यप्रणालीद्वारे ही मिटिंग सुरु आहे. आज रविवार असूनही मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावल्याने त्या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यत येत आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये आजही मार्केट आणि रस्त्यावर नागरिकांची गर्दी वाढत असल्याने सरकारकडून कठोर निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
उद्धव ठाकरेंनी बैठकीआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्यासोबत देखील (Raj Thackeray ) फोनवरुन चर्चा केली. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना सहाकार्य करण्याच आवाहन केलं आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना केलं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या फोनवरुन संवाद झाल्याची माहिती मनसेने दिली आहे. (Lockdown may have to be done, so cooperate, said CM Uddhav Thackeray to MNS chief Raj Thackeray)
उद्धव ठाकरेंच्या या आवाहनानंतर आपण सर्वांनी सूचनांचं पालन करावं, सरकारी यंत्रणांना संपूर्ण सहकार्य करावं, असं आवाहन मनसेने केलं आहे.
जाहीर आवाहन! pic.twitter.com/UVnE55PM0m
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 4, 2021
तत्पूर्वी, उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही फोन केला. परिस्थिती खूप गंभीर आहे. त्यामुळे काही निर्बंध कडक करावे लागतील. विरोधीपक्ष म्हणून तुम्ही सहकार्य करा, असं उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना सांगितले. यानंतर आवश्यक त्या उपाययोजनांना आम्ही सहकार्य करु. आम्हाला कोरोनाबाबत राजकारणापेक्षा जनतेचे हित कायम महत्वाचे राहिले आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं. भाजपा सरकारच्या पाठीशी नक्कीच उभी राहील, असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले.
Uddhav Thackeray: निर्बंध कडक करावे लागतील, सहकार्य करा; उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना फोन https://t.co/9qgOI2uLyQ@BJP4Maharashtra@ShivSena
— Lokmat (@MiLOKMAT) April 4, 2021
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी शनिवारी विविध क्षेत्रांतील मान्यवर, तज्ज्ञांशी चर्चा केली. राज्यातील प्रसारमाध्यमांच्या संपादकांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी लॉकडाऊन अटळ असल्याचे स्पष्ट संकेत दिले. अन्य राज्यांमध्ये काय सुरू आहे, यावर मी बोलणार नाही. मला महाराष्ट्रातील जनतेचा जीव मोलाचा आहे, असे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट सांगितले. या बैठकीला वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुखही उपस्थित होते.
बैठकीत संपादकांनीही कोरोना साखळी तोडण्यासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना केल्या. त्यावर सकारात्मक विचार करण्याची ग्वाही ठाकरे यांनी दिली. राज्य सरकार कुठलेही आकडे लपवत नाही. सर्व खरी माहिती दिली जात आहे, माध्यमांनीही जनजागृती करून कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी करण्याचा निर्धार करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.