मुंबई – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे देशात ३ लाखांहून अधिक लोकांना लागण झाली आहे तर महाराष्ट्रात याचा आकडा १ लाखांच्या वर पोहचला आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित मुंबईत असून ही संख्या ५० हजारांपर्यंत पोहचली आहे. राज्यात दिवसाला कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. पण ४९ हजारांपर्यंत कोरोनाग्रस्त उपचार घेऊन घरी परतले ही राज्यासाठी समाधानाची बाब आहे.
राज्यात मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळल्याने मुंबईची लाइफलाईन लोकल पुन्हा कधी सुरु करणार? हाच प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. लोकल सुरु नसल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बस, खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे मुंबईची लोकल सुरु करावी अशी मागणी होत आहे. राज्य सरकारनेही यासाठी रेल्वेकडे परवानगी मागितली आहे.
रविवारी रेल्वेचे अधिकारी, महापालिका अधिकारी यांच्यात बैठक सुरु असून यात काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. द प्रिंट या इंग्रजी वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार मुंबईची लोकल पुढील आठवड्यापासून सुरु करण्याचा विचार आहे. गेल्या मार्च महिन्यापासून मुंबईत लोकल ठप्प आहे. मात्र आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबई लाईफलाईन सुरु करण्यात येऊ शकते. त्यासाठी मोटारमन आणि पोलिसांना सक्रीय राहण्याचेही आदेश मिळाले आहेत.
रेल्वे सेवा सुरु केल्यास कशारितीने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवेश द्यावा, किती लोकल्स सुरु कराव्यात, सोशल डिस्टेंसिंगसाठी काय उपाययोजना कराव्यात यासारख्या विषयांवर महापालिका अधिकारी, रेल्वे यांच्याशी बोलून राज्य सरकार निर्णय घेणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे सुरु करण्याचा विचार आहे. राज्य सरकारने तशाप्रकारे परवानगी मागितली आहे. श्रमिक स्पेशल ट्रेनप्रमाणेच या लोकल्सने प्रवास करणाऱ्यांची माहिती राज्य सरकारला जमा करण्यास सांगितले आहे. त्याचसोबत मोठ्या स्टेशन व्यतिरिक्त कोणत्याही स्टेशनवर लोकल्स थांबणार नाहीत असं सांगितले आहे.
याबाबत सेंट्रल रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे की, आम्हाला आतापर्यंत अशाप्रकारे कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नाहीत. याबाबत अधिकृतरित्या दुजोरा मिळाला अथवा आदेश आल्यानंतर अपडेट दिली जाईल असं सांगितले आहे. त्यामुळे महापालिका, रेल्वे आणि राज्य सरकारच्या यांच्यातील बैठकीत चर्चा होऊन काय निर्णय होतो याची वाट पाहावी लागेल.