मुंबई : जग साथीच्या रोगाने ग्रस्त असताना आम्ही कोणत्याही परिस्थितीवर मात करण्यासाठी एकमेकांना पाठिंबा देण्यास कटिबद्ध आहोत. देशव्यापी लॉकडाउनच्या काळात मुंबई अत्यावश्यक सेवा कोणत्याही गोंधळा शिवाय पुरवून शाश्वत विकासासाठी प्रयत्नशील राहिली. प्रभाग स्तरीय नियंत्रण कक्षामार्फत तपासणी, चाचणी, विलगीकरणच्या माध्यमातून कोविडवर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचलली आहेत. प्रभाग स्तरीय आपत्कालीन कक्षाने अत्यंत कार्य क्षमतेने कार्य केले आहे. धारावी सारख्या दाट लोकवस्ती असलेल्या भागात जनजागृती संनिरीक्षण मोहीम राबविण्यात आली होती. जागतिक आरोग्य संघटनेने कोविडवर नियंत्रण आणण्यासाठी राबविलेल्या धारावी मॉडेलचे कौतुक केले आहे, असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
ब्रिक्स मैत्री शहरे आणि स्थानिक शासन सहकार्य मंच, रशियन फेडरेशन यांच्या वतीने आयोजित वेबिनार परिषदेला संबोधित करताना महापौर बोलत होत्या. ब्रिक्स राष्ट्रसमूहाच्या आधुनिक शहरांमध्ये शाश्वत विकास लक्ष्य साध्य करण्यावर अधिक भर देणार असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले. ब्रिक्स राष्ट्रांमध्ये भारत,रशिया,चीन, ब्राझील, दक्षिण आफ्रिका या राष्ट्रांचा सहभाग असून भारतातर्फे मुंबई हे सदस्य शहर या वेबिनारमध्ये सहभागी झाले होते. महापौर म्हणाल्या की, निरोगी जीवनाची हमी देणे, दर्जेदार शिक्षण आणि रोजगाराची समान संधी पुरविणे याद्वारे शाश्वत विकास साध्य केला जाऊ शकतो. राहणीमानाचा दर्जा,शाश्वत सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या संधी सुधारित करण्यास महापालिकेच्या स्तरावर आम्ही कटिबद्ध आहोत. संयुक्त राष्ट्राद्वारे निश्चित केलेल्या शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्याकरिता गत काही महिन्यात परवडणाऱ्या आणि दर्जेदार आरोग्य सेवा, स्थलांतरित कामगार आणि बेघरांसाठी अन्न पुरविणे, संगणकाद्वारे सर्वसमावेशक शिक्षण, स्वच्छ पाणी आणि स्वच्छता, हरित कवच वाढविणे,स्थानिक उद्योजकांमध्ये नवनिर्मिती करता व महिला बचत गटाच्या बचतगटातंर्गत स्थानिक महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणे अशी विशेष पावले उचलण्यात आली आहेत. दरम्यान, संकटाच्या वेळी जग भारतीयांच्या आणि विशेष करून मुंबईकरांच्या मैत्रीस केव्हाही साद घालू शकेल, असेही महापौर म्हणाल्या.