लॉकडाऊन : मुंबईकर करतायेत अवकाश निरिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 05:30 PM2020-05-13T17:30:58+5:302020-05-13T17:31:53+5:30
गुरु, शनी आणि चंद्राचे एकत्र दर्शन
मुंबई : मंगळवारी रात्री आकाशात नागरिकांना गुरु, शनी आणि चंद्र एकत्र पाहण्यास मिळाले असून, आता गुरु आणि शनी एकाच जागी राहणार असले तरी चंद्र मात्र त्याची जागा बदलणार असून, एका महिन्यांनी पुन्हा हे तिघे नागरिकांना एकत्र पाहण्यास मिळतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लॉकडाऊनच्या काळात घरात बसलेले मुंबईकर कोरोनाला हरवितानाच विज्ञानाशी निगडीत विविध प्रयोग करत असून, अवकाश निरिक्षणही करत आहेत. दरम्यान, १६ मे रोजीच्या आकाशात चंद्र, गुरु आणि शुक्र यांची युती होईल, असा मेसेज समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. याची पडताळणी करण्यासाठी वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्राशी संपर्क साधला असता केंद्राने सांगितले की, चंद्र, गुरु आणि शुक्र याची अशी काहीही युती वैगेरे होणार नाही.
नेहरु विज्ञान केंद्राच्या शिक्षण सहाय्यक शीतल चोपडे यांनी सांगितले की, चंद्र, गुरु आणि शुक्र याची युती होऊ शकते. मात्र ती १६ मे रोजी होणार नाही. समाज माध्यमांवर जे मेसेज फिरत आहेत; त्यात काही तथ्य नाही. आजघडीला शुक्र सायंकाळचा तारा आहे. त्यास आपण इव्हिनिंग स्टार असे म्हणून शकतो. रात्री नऊच्या सुमारास तो मावळतो. त्यामुळे तो मध्यरात्री आकाशात दिसणे शक्यच नाही. गुरु ग्रह जवळपास मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास उगवतो. १६ मे रोजी चंद्र रात्री ऊशिरा सव्वादोनच्या आसपास उगवणार आहे. त्यामुळे या दिवशी गुरु आणि चंद्र हे दोन्ही जरी आकाशात असले तरी त्यांच्यामध्ये अंतर असेल आणि सोबत शुक्र नसेल. त्यामुळे सांगितलेली युती होणे आणि हसरा चेहरा (स्माईली फेस) तयार होणे शक्य नाही. चंद्र, गुरु आणि शुक्र याची युती होऊ शकत नाही, असे नाही. मात्र सध्या १६ मे रोजी असे काही होणार नाही. गुरु आणि शुक्र हे रात्रीच्या आकाशात ठळकपणे दिसणारे दोन ग्रह आकाशात सोबत येणे अतिशय दुर्मिळ आहे. दोन ते तीन वषार्तून अशा घटना घडतात; ज्यावेळी असे ग्रह एकत्र येतात. फेब्रुवारी २०२१ साली शुक्र आणि गुरु एकत्र येऊ शकतात. त्यामुळे समाज माध्यमांवर व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये तथ्य नाही.