Lockdown News: दिल्लीत यूपीएससीचे परीक्षार्थी १,५०० विद्यार्थी अडकले: राज्यात परत आणण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 02:39 AM2020-05-04T02:39:24+5:302020-05-04T07:24:02+5:30
स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी व्यवस्था करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे केली आहे.
कल्याण : यूपीएसी परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातून दिल्ली येथे गेलेले १ हजार ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी लॉकडाउनमुळे अडकले आहेत. त्यांना पुन्हा राज्यात आणण्याची व्यवस्था करावी अशी मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
या विद्यार्थ्यांना विशेष बस किंवा गाडीतून आणावे, असे शिंदे यांनी सूचित केले आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खरगे आणि अन्य अधिकाऱ्यांशी खासदार शिंदे यांनी स्वत: संपर्क साधला आहे. दिल्लीत स्पर्धा परीक्षेनिमित्त अडकलेल्या या विद्यार्थ्यांनी शिंदे यांच्याशी संपर्क साधून त्यांना राज्यात नेण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली होती. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था दिल्लीतील जुने राजेंद्रनगर येथे करण्यात आली आहे.
सत्यजीत तांबे यांचे केजरीवाल यांना पत्र
स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी व्यवस्था करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे केली आहे.
पुणे विभागात रुग्णसंख्या दोन हजारांवर
पुणे : विभागात आतापर्यंत ४६३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बाधित रुग्णांची संख्या २ हजार १४७ वर जाऊन पोहचली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्ण १ हजार ५७१ आहेत. विभागात कोरोनाबाधित ११३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ७२ रुग्ण गंभीर आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. विभागात २,१४७ बाधित रुग्ण असून ११३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्ह्यात १,९१२ बाधित रुग्ण असून १०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यात ७४ बाधित रुग्ण असून २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात ११४ बाधित रुग्ण असून ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात ३३ बाधित रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला. कोल्हापूर जिल्ह्यात १४ बाधित रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
नांदेडमध्ये तिसरा बळी
औरंगाबाद : औरंगाबाद व नांदेडवरील कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे. रविवारी नांदेडला एका महिलेचा मृत्यू झाला. औरंगाबादेत नवे २६ तर नांदेडला ५ रुग्ण आढळल्याने मराठवाड्याची एकूण रुग्णसंख्या ३९६ वर जाऊन पोहोचली आहे. अन्य जिल्ह्यांत सायंकाळपर्यंत नवा रुग्ण आढळला नव्हता.
जिल्हानिहाय विद्यार्थ्यांची संख्या
अहमदनगर-५२, अकोला-२८, अमरावती-४५, औरंगाबाद-३२, बीड- ४४, भंडारा-३७, बुलडाणा-३७, चंद्रपूर-२८, धुळे-१४, गडचिरोली-९, गोंदिया-१०, हिंगोली-१७, जालना-१४, जळगाव-२६, कोल्हापूर-४७, लातूर-३२, मुंबई-३०, मुंबई उपशहरे-७, नागपूर-६२, नांदेड-६२, नंदुरबार-४, नाशिक-५७, उस्मानाबाद-१८, पालघर-७, परभणी-२६, पुणे-१०९, रायगड-८, रत्नागिरी-४, सांगली-३०, सातारा-४९, सिंधुदुर्ग-३, सोलापूर-४९, ठाणे-४३, वर्धा-१४, वाशिम-२०, यवतमाळ-१५