Lockdown News: सरकारी यंत्रणेतील गोंधळाचा फटका; स्थानिक पातळीवर समन्वयाचा अभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 04:20 AM2020-05-08T04:20:59+5:302020-05-08T04:22:11+5:30

व्यापारी, उद्योजक आणि ग्राहकही संभ्रमात

Lockdown News: Chaos in government machinery; Lack of coordination at the local level | Lockdown News: सरकारी यंत्रणेतील गोंधळाचा फटका; स्थानिक पातळीवर समन्वयाचा अभाव

Lockdown News: सरकारी यंत्रणेतील गोंधळाचा फटका; स्थानिक पातळीवर समन्वयाचा अभाव

Next

मुंबई : कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदी आणि संचारबंदीत काही प्रमाणात शिथिलता आणली असली तरी, सरकारच्या विविध यंत्रणेमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने लॉकडाऊनचा फज्जा उडाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. शिवाय, स्थानिक पातळीवर विविध यंत्रणा स्वतंत्रपणे काम करत असल्याचे एकूणच गोंधळाची परिस्थिती आहे.

३ मे रोजी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू होत असतानाच राज्य सरकारने ग्रीन आणि आॅरेंज झोनमधील जिल्ह्यात निर्बंध शिथिल करत जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसोबत इतर प्रकारच्या एकल दुकानांना परवानगी दिली. त्यात इलेक्ट्रिक वस्तू, कपडे, सलून, मोबाईल, पुस्तके आदी दुकानांचा समावेश होता. मात्र, बाजारपेठेत एका रांगेत असलेली पाचच दुकाने सुरू होतील, असे सांगण्यात आले. तसेच एकल दुकाने कोणती, हे ठरविण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.

दुकानांच्या वेळाबाबत संभ्रम
औषधी आणि जीवनावश्यक वस्तुंची दुकाने चोवीस तास उघडी राहतील, असे सरकारने पहिल्या लॉकडाऊनच्या सुरुवातीला जाहीर केले होते. मात्र, स्थानिक प्रशासनाने विशेषत: जिल्हाधिकाऱ्यांनी मर्जीने वेळा ठरविल्या. त्यामुळे काही ठिकाणी सकाळी सात ते सांयकाळी सहा, तर काही ठिकाणी सकाळी सहा ते रात्री ९ वाजेपर्यंत दुकाने उघडली. त्यात ३ मे रोजी एकल दुकानांची भर पडल्याने पुन्हा वेळेबाबत संभ्रम निर्माण झाला. गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आॅड-इव्हन पद्धतीने दुकाने उघडण्यास परवानगी दिली. मात्र, त्यातून गोंधळात आणखीनच भर पडली.

मजूर-कामगारांच्या स्थलांतराचा अर्थव्यवस्थेला घोर
मुंबई : लॉकडाउनमुळे हाताला काम नसलेल्या मजुरांना आपापल्या गावी जाण्याची परवानगी मिळाल्यानंतर हजारो मजुरांचे उलट स्थलांतर सुरू झाले आहे. मात्र, मजूर गावी गेल्यानंतर ते पुन्हा लवकर पतरणार नाहीत. त्यामुळे लॉकडाउनचे निर्बंध सरल्यानंतर उद्योजक, बिल्डर आणि अन्य व्यावसायिकांना आपले कामकाज पूर्वपदावर आणताना अडथळे निर्माण होतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

दारू विक्री आणि लॉकडाऊनचा फज्जा
राज्य सरकारने दारुबंदी असलेले जिल्हे आणि कन्टेंमेन्ट भाग वगळून इतर भागात दारू विक्रीची दुकाने उघडण्यास परवानगी दिली. मात्र, याबाबत राज्य सरकार आणि एक्साईज विभागाने वेगवेगळे आदेश काढल्याने गोंधळ उडाला. त्यात स्थानिक प्रशासनाने वेगळी भूमिका घेतल्याने गोंधळ वाढला. लोकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या.

अकोल्यात गोंधळात गोंधळ
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्याचे एकमेव ठिकाण. येथे तब्बल ५६ ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांवर उपचार होत आहे. येथे दाखल रुग्ण तसेच रिपोर्टच्या प्रतीक्षेत असलेल्या संदिग्ध रुग्णांनी यंत्रणेवर अनेकदा प्रश्न उपस्थित केले. यावर वैद्यकीय यंत्रणा बोलायला तयार नाही, तर महसूल यंत्रणा मूग गिळून गप्प आहे.

जळगावात संभ्रमामुळे वाढला गोंधळ
जळगाव : मंगळवारपासून सुरु झालेली काही व्यापारी प्रतिष्ठाने गर्दी वाढल्याने बंद करावी लागली. बुधवारी बहुतांश दुकाने उघडलीच नाहीत. यात सुवर्ण बाजाराचा समावेश आहे. शेतमाल आणण्यास शहरात मज्जाव होत आहे.

लातुरात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
लातूर : येथे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे़ जिल्हाधिकारी आदेश काढतात, मात्र यंत्रणा धावत नाही़ हजारो लोक नियम मोडतात, तुरळक ठिकाणीच कारवाई होते़ क्वारंटाईनमध्ये असलेल्यांना अडचणींना सामोरे जावे लागले़पुण्यात यंत्रणांमध्ये संवादाचा अभाव

पुणे : पुण्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चाललेली असतानाच यंत्रणांमध्ये मात्र संवादाचा अभाव आहे की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे. मागील काही दिवसांत महापालिका-पोलीस- जिल्हा प्रशासन यांनी काढलेल्या विविध आदेशांमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

औरंगाबादला रेड झोन आणखी गडद
औरंगाबाद : लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात पोलीस, महसूल यंत्रणा आणि महानगरपालिका यांनी लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी चांगले प्रयत्न केले. मात्र, नंतर यंत्रणेत शिथिलता आल्याचे चित्र आहे.

चक्क झाडाखाली विलगीकरण
नाशिक : गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थानसह राज्याच्या अन्य ठिकाणी शेकडो मजूर अडकले होते. त्यांची घर वापसी सुरु झाली आहे. मात्र गाव पातळीवर त्यांचे चक्क नदीकाठच्या झाडाखाली विलगीकरण केल्याचे बागलाण तालुक्यात उघडकीस आले आहे.

उस्मानाबादेत नियमांची पायमल्ली
उस्मानाबाद : जिल्हा ग्रीन झोनमध्ये असल्याने लॉकडाऊनमधून मोठीच शिथिलता मिळाली आहे़ मद्यविक्री व पानटपºया वगळता अन्य सर्वच आस्थापना उघडण्यास परवानगी मिळाल्याने संपूर्ण बाजारपेठ खुली झाली़

Web Title: Lockdown News: Chaos in government machinery; Lack of coordination at the local level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.