Lockdown News: ‘रेड झोन’मधील शिक्षकांना अतिरिक्त होण्याची भीती; विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर होणार परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 02:50 AM2020-05-08T02:50:35+5:302020-05-08T02:50:43+5:30
मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांना निवेदन सादर
:
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या संचारबंदी सुरू आहे आणि त्यामुळे शैक्षणिक संस्था, शाळा, कनिष्ठ महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आलेली आहेत. शाळा सुरू झाल्यावरही याचा परिणाम दिसून येणार असून, सुरक्षिततेच्या कारणाने शैक्षणिक प्रवेश लगेच होण्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अद्याप कोणत्याही अनुदानित शाळेत इयत्ता १ली, ५वी आणि ८वीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले नाहीत. त्यामुळे या वर्षी बरेच शिक्षक पुढील शैक्षणिक सत्रात अतिरिक्त होण्याची शक्यता आहे़ अशा परिस्थितीत अनुदानित शाळेतील शिक्षकांना पुढील शैक्षणिक सत्रात अतिरिक्त करू नये, अशा मागणीचे निवेदन भाजप शिक्षक आघाडीचे मुंबई-कोकण विभाग संयोजक अनिल बोरनारे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, शिक्षण आयुक्त व शिक्षण सचिव यांना पाठविले आहे.
आता लॉकडाउन १७ मेपर्यंत वाढल्यामुळे संपूर्ण राज्यातील अनुदानित शाळेतील प्रवेशप्रक्रिया रखडली आहे. पुढील शैक्षणिक सत्राच्या संपूर्ण वेळापत्रकाचे नियोजन बदलणार असल्याचे स्पष्ट आहे. शाळा बंद असल्याने व लॉकडाउनमुळे अद्याप एकाही विद्यार्थ्याचा प्रवेश झालेला नसल्याने मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीही फार चिंतेत सापडले आहेत, कारण विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात त्यांची पदे मंजूर होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पट कमी झाला तर शिक्षकांचाही पट कमी होऊन त्यांना अतिरिक्त होण्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे शिक्षकांना अतिरिक्त होण्याची भीती वाटत असून तणाव वाढत असल्याची स्थिती निर्माण झाल्याची माहिती अनिल बोरनारे यांनी दिली. मागील शैक्षणिक सत्र संपले असून लॉकडाउन १७ मेपर्यंत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर याचा निश्चितच विपरीत परिणाम होऊन पुढील शैक्षणिक सत्रात मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्तहोऊ शकतात. त्यामुळे निदान रेड झोन जिल्ह्यातील अनुदानित शाळांतील शिक्षकांना पुढील शैक्षणिक सत्रात अतिरिक्त ठरविण्यात येऊ नयेत व त्याअनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
संचमान्यतेसाठी आधार नोंदणी करणार कशी?
यंदा संचमान्यता होणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करावी, असे निर्देश शाळा व संस्थाचालकांना देण्यात आले आहेत. मात्र संचारबंदी असताना शिक्षक शाळांमध्ये जाणार कसे आणि ही माहिती अद्ययावत करणार कसे, असा प्रश्न शिक्षक, मुख्याध्यापक उपस्थित
करत आहेत.
विशेष म्हणजे २ मेपासून उन्हाळी सुट्टी दिली जाते, अशा वेळेस शिक्षकांना अतिरिक्त काम देणे कितपत योग्य आहे, असा सवाल शिक्षक लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी केला आहे.