अतुल कुलकर्णी
मुंबई : राज्य एकीकडे कोरोनाशी लढा देत असताना सात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांना दोन महिन्यांपासून कायम स्वरुपी पोस्टींगच दिलेली नाही. पोलिस दलात दबदबा असलेले सदानंद दाते दिल्लीतील पोस्टींग संपवून महाराष्ट्रात परत आले पण त्यांना दोन महिन्यापासून कोणतीही पोस्टींग नाही. अनेक महामंडळे, महत्वाची कार्यालये यांचे प्रमुख विनाकामाचे बसून आहेत. हे चित्र एकीकडे असताना दुसरीकडे राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या विषयी सगळे मंत्री तक्रारी करत आहेत.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी तर मुख्य सचिवांना तर तुम्ही पाच वर्षे कायम रहा, आम्हाला तुमच्यासोबत काम करायला आवडेल अशा उपहासात आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली तर मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी आणि मुख्य सचिवांमध्ये एका व्हिडीओ कॉन्सरन्समध्ये जोरदार जाहीर शाब्दीक युध्द झाले आणि ते परदेशींसोबत असणाऱ्यां मनपाच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी समोरच पाहिले. या सगळ्यामुळे राज्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये टोकाची नाराजी पसरलेली आहे.
संजीव जैस्वाल, भूषण गगराणी, अश्निनी भिडे, विनीता सिंघल, राजीव जलोटा, नंदकुमार, अतुल पाटणे हे अधिकारी गेल्या दोन ते तीन महिन्यापासून विना पोस्टींग आहेत. त्यातल्या अनेकांना मंत्रालय अथवा मुंबई मनपामध्ये नियंत्रण कक्षात बसवण्यात आले आहे. परदेशी यांनी गगराणी यांची मागणी केली होती तर गगराणी यांना तेथे न देता त्यांना नियंत्रण कक्षात माध्यमांच्या संयोजनाची जबाबदारी देण्यात आली. २६/११ च्या घटनेत स्वत:चा जीव धोक्यात घालणारे आयपीएस अधिकारी सदानंद दाते दोन महिन्यापासून पोस्टिंगच्या प्रतीक्षेत आहेत. ते म्हणतात, मला कुठेही पोस्टिंग दिली तरी तक्रार नाही, पण रिकामे बसण्यापेक्षा कोरोनाच्या लढ्यात काम तरी करता येईल पण तेही तसेच बसले आहेत.नितीन करीर यांना तिसऱ्या लॉकडाऊन नंतर परराज्यातील नागरिकांना त्यांच्या राज्यात पाठवण्याचे काम सोपवण्यात आले. तोपर्यंत त्यांच्याकडे असे तसेच काम होते. एमएसआरडीसी, एमआयडीसी, सिडको, एमएमआरडीए अशा महत्वाच्या विभागांचे आयएएस अधिकारी विना जबाबदारीचे रिकामे बसलेले आहेत. गेल्या काही दिवसात नाही म्हणायला एमएमआरडीएकडे बीकेसीमध्ये हॉस्पिटलचा टेंट उभारण्याचे काम दिले गेले. तर चार दिवसांपूर्वी सीताराम कुंटे यांच्याकडे एमएमआर रिजनची जबाबदारी दिली गेली. राज्यात ३५० आयएएस अधिकारी आहेत पण त्यातल्या जवळपास १५० अधिकाऱ्यांना कोरोनाशी संबंधित कोणतेही काम देण्यात आलेले नाही. मुख्य सचिव ज्या जवळकीने आय.एस. चहेल, आभा सिंह, मनोज सौनिक आणि राजीव मित्तल यांना जबाबदाऱ्या देत आहेत त्या जवळकीने आम्हाला जबाबदारीचे काम दिले जात नाही असा प्रश्न अनेक अधिकाऱ्यांनी बोलून दाखवला आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे त्यांच्या विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्याविषयी तीव्र नाराज आहेत. त्यांनी हे पत्रकारांना बोलूनही दाखवले आहे. तर आपल्याकडे किती पीपीई कीट, एन ९५ मास्क आहेत, किती जणांनी सीएसआरमधून आपल्याला कोणती साधने दिली याची माहिती जनतेला सांगा असे स्वत: वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगूनही त्यांच्या विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी ती माहिती जाहीर करत नाहीत. आपल्याला विचारल्याशिवाय कोणतीही माहिती बाहेर द्यायची नाही असे मुखर्जी सांगतात. तर आपल्या परवानगी शिवाय कोणीही व्हिडीओ कॉन्फरन्स घ्यायची नाही, असे मुख्य सचिव सांगतात अशा तक्रारी आहेत. यावर कोणीही स्पष्टपणे बोलायला तयार नाही. रोज नवनवीन निघणाऱ्या आदेशांबद्दल अनेक जिल्हाधिकाऱ्याना स्पष्टीकरण पाहिजे असते पण आमच्याशी कोणी बोलत नाही अशा त्यांच्या तक्रारी आहेत. मुंबईचा महापूर, २६/११, किंवा सांगली, साताऱ्यातील महापुरात अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोबत अधिकारही दिले गेले तसे काहीही होताना दिसत नाही, त्यामुळे प्रत्यक्षात ‘ग्राऊंड’वर संवादाचा मोठा अभाव आहे. आम्हाला विश्वासातच घेतले जात नाही, आम्हाला न विचारताच निर्णय होतात अशा तक्रारी सगळेच मंत्री करत आहेत पण आज ही बोलण्याची वेळ नाही असे खाजगीत सांगत आहेत.
तरीही ऊर्जामंत्री नितीन राऊत, दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, मदत पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि स्वत: विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे काही दिवसापूर्वी मुंबईत येऊन मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करून निघून गेले. या परिस्थितीत आम्ही काम तरी कसे करायचे अशा तक्रारीही तीनही पक्षाच्या मंत्र्यांनी केल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील काही अधिकारी स्वत:ला सुपर सीएम समजत आहेत अशा शब्दात टीका केली आहे.