Lockdown News: लॉकडाउन काळात गरजुंना मिळाला रेल्वेचा आधार; आयआरसीटीसीच्यावतीने अन्नदान सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 01:43 AM2020-05-06T01:43:23+5:302020-05-06T01:43:36+5:30
मिशन फूड : पश्चिम रेल्वे, आयआरसीटीसीच्यावतीने अन्नदान सुरू
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या सहा विभागात पश्चिम रेल्वे आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी ) अन्नदान सुरू केले आहे. लॉकडाउनमध्ये ठिकठिकाणी अडकलेल्या मजूर, निराधारांच्या दोन वेळच्या जेवणाची जबाबदारी घेतली आहे. त्यानुसार रेल्वेच्या मिशन फूड डिस्ट्रिब्युशन मोहिमेची सुरुवात केली आहे. लॉकडाउन सुरू झाल्यापासून गरजूंना खिचडीचे वाटप करण्यात येत आहे. २९ मार्च ते ५ मेपर्यंत ४ लाख ७४ हजार जणांचे पोट भरण्यात आले आहे.
मुंबई सेंट्रल येथील जनजीवनराम रुग्णालय, माटुंगा रोड, चर्नी रोड आणि पश्चिम रेल्वेच्या स्थानक परिसरात ५ मे रोजी दिवसभरात ७ हजार १८८ पाकिटांचे निराधार नागरिकांना वाटप करण्यात आले. आयआरसीटीसीच्या बेस किचनमधून गरजूंना खिचडी देण्यात येत आहे. मुंबई सेंट्रल आणि अहमदाबाद येथील आयआरसीटीसीच्या बेस किचनमधून ७ हजार १८८ पाकिटांची निर्मिती केली आहे. मागील ३८ दिवसांत ४ लाख ७४ हजार जणांना अन्नदान केली असल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली आहे. लॉकडाउन काळात पश्चिम रेल्वेचे वाणिज्य विभागाचे १ हजार ४१६ कर्मचारी अन्नदान करण्याचे काम करत आहेत. यामध्ये आरपीएफचे जवान आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने पाकिटांचे वाटप केले जात आहे. आयआरसीटीसी आणि पश्चिम रेल्वे कोरोनाशी सामना करत आहे. या कठीण काळात गरजंूना मदत केली जात आहे. २९ मार्चपासून येथे आयआरसीटीसीच्या मुंबई सेंट्रल बेस किचन आणि अहमदाबाद बेस किचनमधून अन्नदान केले जात आहे. देशासह संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा प्रसार वाढला आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन घोषित केले आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र या कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका बेघर आणि रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांना बसत आहे. त्यामुळे त्यांना अन्नदान करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
४ लाख ७४ हजार जणांना अन्नदान
मागील ३८ दिवसांत ४ लाख ७४ हजार जणांना अन्नदान केले असल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली आहे. लॉकडाउन काळात पश्चिम रेल्वेचे वाणिज्य विभागाचे १ हजार ४१६ कर्मचारी अन्नदान करण्याचे काम करत आहेत. यामध्ये आरपीएफचे जवान आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने पाकिटांचे वाटप केले जात आहे.