मुंबई : मद्यविक्रीच्या दुकानांबाहेर लोकांची झुंबड उडल्यामुळे पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मंगळवारी परिपत्रक काढून केवळ किराणा माल, औषध विक्रीची दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र आरोग्य, अत्यावश्यक यंत्र दुरुस्ती करणे शक्य होत नसल्याने या परिपत्रकात पुन्हा सुधारणा करण्यात आली. त्यानुसार, आता अत्यावश्यक सेवेसोबतच इलेक्ट्रॉनिक आणि हार्डवेअरची दुकाने सुरू राहतील.
लॉकडाउनचा कालावधी १७ मेपर्यंत आहे. त्यात शिथिलता आणत अत्यावश्यक सेवांबरोबर मद्यविक्रीची दुकाने, रुग्ण नसलेल्या परिसरातील पाच दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. सोमवारी मुंबईतील सर्व मद्यविक्रीच्या दुकानांवर लोकांची गर्दी झाली. परिणामी, आयुक्तांनी २४ तासांतच ही शिथिलता मागे घेत किराणा मालांची दुकाने, अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील, असे सुधारित परिपत्रक काढले. हा घोळ कायम असताना नवीन परिपत्रक बुधवारी रात्री पावणेबाराच्या दरम्यान काढले. त्यानुसार आरोग्य, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र अत्यावश्यक सेवेत काम करीत असले तरी येथील बिघडलेले अनेक यंत्र दुरुस्त करण्यासाठी लागणारा माल मिळू शकत नाही. त्यासाठी बंद असलेले इलेक्ट्रॉनिक आणि हार्डवेअरची दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आयुक्तांनी या परिपत्रकात स्पष्ट केले आहे.एकल दुकानांना परवानगीमुंबईतील सर्व २४ विभागांच्या सहायक आयुक्तांनी त्यांच्या प्रभागात या प्रकारच्या एकल दुकानांना उघडण्याची परवानगी द्यावी. मात्र, एका रस्त्याच्या लेनवरील केवळ एकाच दुकानाला परवानगी देण्यात येईल, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. इलेक्ट्रॉनिक आणि हार्डवेअरच्या दुकानांबाबत आयुक्तांनी सकारात्मक निर्णय घेतला. मात्र, मद्यविक्रीच्या दुकानांबाबत कोणतेही नवीन बदल नाहीत. मुबंई शहर हे रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रसार अधिक वाढू नये, या खबरदारीसाठी मद्याची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.