मुंबई – राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा २२ हजारांच्या वर पोहचला असून ८०० पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी देशात तसेच राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक मजूर आणि विद्यार्थी विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. या लोकांना त्यांच्या इच्छितस्थळी पोहचवण्याची जबाबदारी परिवहन विभागाने घेतली आहे. मात्र प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका सर्वसामान्य जनतेला होत आहे.
राज्यातील एसटी प्रवास मोफत या घोषणेने अनेक ठिकाणी लोकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी परराज्यातील मजुरांसाठी राज्याच्या सीमेपर्यंत नेणे आणि सीमेवरुन महाराष्ट्रातील लोकांना त्यांच्या जिल्ह्यात पोहचवणे यासाठी बससेवा मोफत असल्याचं सांगितले. अवघ्या काही तासात राज्य सरकारने याबाबतच्या निर्णयात बदल केला होता. मात्र तत्पूर्वी अनिल परब यांनी ट्विटर हँडलवरुन याची घोषणा केल्याने सध्या हे ट्विट व्हायरल होत आहे त्यामुळे अनेक एसटी बस डेपोबाहेर लोकांची गर्दी होत आहे. यावरुन भाजपा आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारला प्रश्न विचारला आहे.
आमदार नितेश राणेंनी ट्विट करुन म्हटलं आहे की, चुकीची माहिती दिली आणि वांद्रे येथे गर्दी झाली म्हणून सरकारने एका पत्रकाराला तात्काळ अटक केली होती. आज चुकीची माहिती दिल्याने एसटी बस डेपो बाहेर गर्दी झाली मग ही माहिती देणारे मंत्री अनिल परब यांना अटक होणार का? असा सवाल करत याची मी वाट पाहतोय असा टोला शिवसेनेला लगावला आहे.
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना मूळ गावी पाठविण्यासाठी राज्य सरकारने ११ मेपासून एसटीच्या मोफत सेवेची घोषणा केली होती. त्यानुसार, सोमवारी राज्यातील विविध भागांत अडकलेले विद्यार्थी, मजूर, नागरिकांनी प्रत्येक एसटी आगाराबाहेर गर्दी केली. मुंबई सेंट्रल येथील आगाराबाहेरही प्रचंड गर्दी झाली होती. अखेर ही गर्दी हटविण्यासाठी पोलिसांना बोलाविण्यात आले. मुंबई सेंट्रल आगाराबाहेर सोमवारी सकाळी मूळ गावी जाण्यास इच्छुक असणारे अनेक जण सर्व कागदपत्रे घेऊन जमा झाले होते. परळ आगाराबाहेरही अशीच गर्दी होती. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र होते. मात्र मोफत सेवा राज्यातंर्गत नसल्याचं समजल्याने नागरिकांमध्ये संताप पाहायला मिळाला.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
लॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेसाठी आत्मघातकी ठरेल- आनंद महिंद्रा
कोरोनामुळे अमेरिकेत वाढला मृतांचा आकडा; तरीही ट्रम्प उचलणार ‘हे’ धोकादायक पाऊल?
"आम्हाला जास्त काही नको, पण किमान पगार द्या"; डॉक्टरांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
“सरकारने आधी कोरोनाच्या तिरडीवरून उठावे; लोक आपोआप कामधंद्याला लागतील”