Join us

Lockdown: बसप्रमाणे लोकल पकडण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या रांगा; सोशल डिस्टेंसिंगचा उडाला फज्जा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 9:02 PM

अत्यावश्यक सेवेतील मोजक्याच कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून लोकल सेवा सुरू झाली आहे. तरी देखील, मंगळवारी बसप्रमाणे लोकल पकडण्यासाठी स्थानकाबाहेर लांबच्या लांब रांगा लागल्या

मुंबई : लोकल सुरू झाल्याची माहिती कर्मचाऱ्यांना नसल्याने सोमवारी लोकलमध्ये गर्दी कमी होती. कमी गर्दी असल्याने फिजिकल डिस्टनसिंग ठेवून कर्मचाऱ्यांचा प्रवास झाला. मात्र मंगळवारी प्रवासी वाढल्याने लोकलमध्ये फिजिकल डिस्टनसिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. 

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर फक्त अत्यावश्यक सेवेतील मोजक्याच कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू आहे. लोकल सुरू झाल्याची माहिती मिळाल्याने सोमवारपेक्षा मंगळवारी गर्दीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे लोकलच्या एका सीटवर तीन कर्मचारी बसले होते. तर, काही कर्मचारी उभ्याने प्रवास करत असल्याचे दिसून आले. मंगळवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास सीएसएमटी ते कल्याण लोकलच्या महिला डब्यात गर्दीचे प्रमाण वाढले होते. 

अत्यावश्यक सेवेतील मोजक्याच कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून लोकल सेवा सुरू झाली आहे. तरी देखील, मंगळवारी बसप्रमाणे लोकल पकडण्यासाठी स्थानकाबाहेर लांबच्या लांब रांगा लागल्या. पश्चिम रेल्वे मार्गावरील विरार आणि मध्य रेल्वे मार्गवरील सीएसएमटी स्थानकावर कर्मचाऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या. लोकलमध्ये फिजिकल डिस्टनसिंगचे तीनतेरा वाजले. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी रेल्वेच्या नावे ताशेरे ओढले. दरम्यान, ज्या कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी मिळाली नाही, त्यांनी बसद्वारे प्रवास केला. 

मंगळवारची गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाने लोकलच्या फेऱ्या वाढविणे आवश्यक आहे. यासह कर्मचाऱ्यांचे कार्यालयीन वेळा बदलल्या पाहिजेत. लोकलमध्ये प्रवास करून संसर्ग वाढण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी बसद्वारे प्रवास करण्यास पसंती देत आहेत. बसमध्ये मर्यादित जागा असल्याने प्रवासी कोंबले जाऊ शकत नाही. त्यामुळे रस्ता मार्गे प्रवास कर्मचारी करण्यास प्रवासी पसंती देत आहेत, अशी  रेल्वे यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी दिली. 

मध्य रेल्वे प्रशासनाने २०० फेऱ्या सोडल्या आहेत. फिजिकल  डिस्टनसिंगचे पालन व्हावे, यासाठी लोकलमध्ये ७०० प्रवासी बसण्याचे नियोजन केले आहे. एखादी लोकल सुटली,  तरी चालेल पण लोकलमध्ये गर्दी करू नये. फिजिकल डिस्टनसिंगचे पालन होण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनीही खबरदारी घ्यावी. मध्य रेल्वे प्रशासन आपल्यापरीने काम करत आहे. सुरक्षा विभाग देखील आपली कामे करत आहेत.  - शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे 

रेल्वे पोलीस, आरपीएफ यांच्याद्वारे स्थानकावर नियोजन करत होते. स्थानकात येण्याचे-जाण्याचे प्रवेशद्वार निश्चित केले आहे. त्यातूनच ये-जा करण्याच्या सूचना सुरक्षा जवानांकडून दिल्या जात होत्या. 

टॅग्स :मुंबई लोकलमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसराज्य सरकारलॉकडाऊन अनलॉक