लाॅकडाऊनमध्ये २ कोटी ८२ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 08:28 PM2020-04-04T20:28:52+5:302020-04-04T20:29:51+5:30
अवैद्य मद्यविक्रि :३६ वाहने जप्त तर ४७२ अटकेत
मुंबई : कोरोना वायरस रोखण्यासाठी असलेल्या लॉकडाउन काळात राज्यातील मद्यविक्री बंद आहे. या कालावधीतील अवैध मद्य विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत १२२१ गुन्हे नोंदविण्यात आले असून एकूण २ कोटी ८२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याशिवाय, ३६ वाहने जप्त केली असून ४७२ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती विभागाने दिली आहे.
शेजारील राज्यांमधून महाराष्ट्रात होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी विभाग २४ तास कार्यरत आहे.त्यानुसार नाकाबंदी केली असून गोवा, दादरा- नगर हवेली, दीव- दमण, कर्नाटक व मध्य प्रदेश राज्यातून अवैध मद्य येणार नाही याकरिता बारा कायमस्वरूपी आंतरराज्य सीमा तपासणी नाक्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी-कर्मचारी तपासणी करीत आहेत. तसेच १८ तात्पुरते सीमा तपासणी नाके देखील उभारण्यात आले आहेत.
अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार करण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्षही सुरू आहे. त्यावर नागरिक तक्रार करू शकतात. तक्रारदारांची नावे गुप्त ठेवली जातील. अवैध मद्य विक्रीविरोधात तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.