मुंबई : कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शाळा बुधवारी उघडल्या, काही ठिकाणी शिक्षकही शाळेत आले; मात्र विद्यार्थी ३१ जुलै नंतरच या शाळांमध्ये येणार आहेत. बहुतांश जिल्हाधिकाऱ्यांनी जुलै अखेरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
जिथे गेले महिनाभर कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही अशा गावांत, परिसरात १ जुलैपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचे ठरले होते. उर्वरित वर्ग टप्याटप्याने ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सुरू करण्यात येणार आहेत. मात्र पहिला टप्पाच तब्बल एक महिना पुढे गेला आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण हाच तूर्त पर्याय आहे. त्यानुसार शाळांमधील शिक्षक आणि पालकांनाही तयारी ठेवावी लागणार आहे.
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत एकाही ठिकाणी आज वर्ग भरले नाहीत. अमरावती महापालिका क्षेत्रात तर १५ आॅगस्टनंतर शाळा सुरू करण्याचे परिपत्रक आयुक्तांनी काढले आहे.
शिक्षण विभागापुढे पेचराज्यात नवीन शैक्षणिक सत्राची ऑनलाईन सुरुवात १५ जूनपासूनच झाली; मात्र प्रत्यक्षात शाळा सुरु करायच्या की नाही? वर्ग भरवायचे की नाही, याबाबत जिल्हाधिकारी, स्थानिक प्रशासन यांमध्ये मतभिन्नता असल्याने शिक्षण विभागच पेचात सापडला आहे. शिक्षण विभागाकडून शाळा सुरू करण्याला संमती देण्यात आली असली तरी स्थानिक प्रशासन तयार नसल्याने गोंधळाची स्थिती आहे.शिक्षणमंत्री घेणार आढावाशाळा सुरु करण्याबाबत संभ्रम आणि मतमतांतरे असल्याने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यासंबंधी शिक्षणाधिकारी यांची बैठक घेणार आहेत. दिलेल्या सूचनांप्रमाणे शाळा व्यवस्थापन समिती व आणि स्थानिक प्रशासन यांचा हा निर्णय असणार आहे, असे शिक्षण विभागाने पुन्हा स्पष्ट केले. अहमदनगर, धुळे, नंदुरबार, नांदेड, सांगली, कोल्हापूर, वाशीम, नागपूर, यवतमाळ यासह बहुतांश जिल्ह्यांत स्थानिक प्रशासनाने परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, तूर्त वर्ग भरविण्याचे कोणतेही आदेश नाहीत, असे स्पष्ट केले. काही ठिकाणी थेट ३१ जुलैपर्यंत शिक्षणसंस्था न सुरू करण्याचे आदेश आहेत.