लॉकडाऊनमुळे वेतन कपात, नोकरीवरुन काढण्याचे प्रकार होऊ नयेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 06:33 PM2020-05-22T18:33:19+5:302020-05-22T18:34:01+5:30
विमानतळावरील कंत्राटी कामगार व नियमित कर्मचाऱ्यांना लॉकडाऊनमुळे वेतन कपात, नोकरीवरुन काढण्याचे प्रकार होऊ नयेत - फेडरेशन ऑफ ऑल इंडिया एव्हिएशनची मागणी
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन सुरु असल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम विविध उद्योगांवर होत आहे. हवाई वाहतूक क्षेत्रावर देखील त्याचा परिमाण झाला आहे. मात्र लॉकडाऊनच्या आडून विमानतळावरील कंत्राटी कर्मचारी, नियमित कर्मचारी व इतरांना नोकरीवरुन काढणे, त्यांच्या वेेतनात कपात करणे असे प्रकार टाळावेत, अशी मागणी फेडरेशन ऑफ ऑल इंडिया एव्हिएशनने केली आहे. फेडरेशनने याबाबत केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी व पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून त्यांच्या कडे ही मागणी केली आहे.
मुंबई इंटरनेशनल एअरपोर्ट प्रा. लिमिटेड (एमआयएल) ला पत्र लिहून या प्रकरणी केंद्र सरकार च्या विविध नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व कामगार, कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, त्यांच्यावर अन्याय केला जावू नये अशी मागणी फेडरेशनचे अध्यक्ष प्रदीप मेनन व मुख्य संघटक सचिव किशोर चित्राव यांनी केली आहे. मुंबई विमानतळावर विविध विभागांमध्ये मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार तैनात आहेत. या कामगारांचे विमानतळाच्या दैनंदिन कामकाजामध्ये मोठे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यामुळे अशा महत्त्वपूर्ण कामगार, कर्मचारी वर्गाला कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा गैरलाभ घेऊन कामावरुन काढण्याचे पाप करु नये. या ओ कामगारांना मुऴातच तुटपुंजे वेतन आहे त्यामुळे त्यांचे वेतन कपात करण्याचा प्रयत्न केला जावू नये अशी अपेक्षा मेनन यांनी व्यक्त केली आहे. देशात व जगभरात हवाई वाहतूक क्षेत्र अत्यंत अडचणीच्या परिस्थितीतून जात आहे ही वस्तुस्थिती आहे. मात्र या क्षेत्राचा पाया असलेल्या या कर्मचाऱ्यांवर कोरोनाच्या नावावर कामावरुन कमी केले जावू नये अशी मागणी संघटनेने केली आहे.