नागपाड्यातील व्यावसायिकाची व्यथा, पोलिसांकड़ून तपास सुरु
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनामुळे व्यवसाय ठप्प झाला. अशात बेरोजगारीमुळे जवळील मशीन विकावी लागली आणि ठगांमुळे मशीनचे पैसेही चोरीला गेल्याचा प्रकार नागपाड्यात समोर आला आहे. याप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळवा येथील रहिवासी असलेले मोहम्मद अस्लम अशरफ अली (३७) यांची यात २० हजार रूपयांना फसवणूक झाली आहे. अली हे मेकॅनिक असून, ते मदनपुरा येथे फेब्रुवारी २०२१मध्ये लेट मशीनवर नटबोल्ट बनविण्याचे काम करत होते. मात्र, लॉकडाऊनमुळे काम बंद पडले. अशात त्यांनी मशीन विकली. दि. १ जुलै रोजी मशीनचे २० हजार रुपये घेऊन भायखळा रेल्वेस्थानक येथून परतत असताना, एका दुकलीने त्यांना अडवले. पोलीस असल्याचे सांगून पंधराशे रुपये घेतल्याचे सांगून, खिसे तपासायला सुरुवात केली. खिशातील रुमालात लपवून ठेवलेले २० हजार रुपये घेऊन दोघेही निघून गेले. ‘अहो, साहेब माझे पैसे परत द्या’ म्हणून तो मागे धावला. मात्र, तोपर्यंत दुकली पसार झाली. अलीने तत्काळ नागपाडा पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरु केला आहे.