मुंबई – राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असल्याने गेल्या २ महिन्यापासून लॉकडाऊन केलं होतं, पण आता हळूहळू अनेक उद्योगधंदे सुरु होत आहेत, लॉकडाऊनच्या काळात राज्यातून ५ लाखाहून अधिक कामगार त्यांच्या मूळ गावी परतले आहेत. त्यामुळे राज्यात निर्माण होणाऱ्या रोजगार संधीच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारने एक उपक्रम हाती घेतला आहे ज्यामुळे उद्योजकांसोबतच राज्यातील बेरोजगार तरुणांचाही फायदा होणार आहे.
राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी याबाबत सांगितले की, बेरोजगार तरुणांना राज्यातील उद्योगांमध्ये उपलब्ध रोजगार संधी तसेच उद्योजकांना राज्यातील विविध भागात उपलब्ध असणाऱ्या मनुष्यबळाची माहिती एकाच क्लिकवर मिळणार आहे. त्यासाठी कौशल्य विकास मंत्रालयाकडून mahaswayam.gov.in ही वेबसाईट लॉन्च करण्यात आली आहे.
या वेबसाईटवर राज्यातील बेरोजगार तरुणांना नोंदणी करायची आहे, हा संपर्ण डेटा उद्योजकांनाही फायद्याचा ठरणार आहे. लॉकडाऊनमध्ये परराज्यातील मजुरांनी राज्यातून पाय काढला, त्यामुळे सध्या बऱ्याच ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. अनेक ठिकाणी लॉकडाऊनमुळे कंपन्या बंद पडल्या होत्या त्यामुळे काहींच्या नोकऱ्या गेल्या होत्या. या तरुणांनाही त्यांच्या कौशल्यानुसार या क्लिकवरुन रोजगाराची संधी मिळणार आहे.
या संकेतस्थळावर विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. शैक्षणिक आणि इतर माहिती यामध्ये तरुणांना नोंद करावी लागणार आहे. या माहितीच्या आधारे एखादा उद्योग अथवा आस्थापनेकडून त्यांना रोजगाराची संधी प्राप्त होऊ शकते. विविध माध्यमांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या रिक्त जागा पाहण्यापेक्षा या वेबसाईटवर रिक्तपदाच्या जाहिराती या टॅबमधून एकाच ठिकाणी अनेक माहिती मिळू शकते. खासगी रोजगारासोबत सरकारी जागांच्या रिक्त पदाची माहितीही या वेबसाईटवर मिळणार आहे.
संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या बेरोजगार युवकांना त्यांच्या कौशल्यानुसार उद्योजक काम उपलब्ध करुन देतील. याशिवाय उद्योजकांनाही त्यांना आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळासाठी याचा फायदा होईल, यासाठी त्यांना उद्योजक म्हणून नोंदणी करावी लागेल, त्यांच्यासाठी नवीन प्लांट, शाखेची स्वतंत्र नोंद करणे, वेळोवेळी निर्माण होणारी रिक्तपदे, मागणीनुसार उमेदवारांची यादी मिळणे, मुलाखती आयोजित करणे अशा विविध सोयी देण्यात आल्या आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
गलवानवर चीनचा अधिकार नाही, तिबेटच्या पंतप्रधानांनी फटकारलं; हा प्रदेश तर...
भारतीय औषध उद्योगाविरोधात चीनचा छुपा डाव उघड; ‘या’ औषधाचा मोठा पुरवठा
…तर युद्ध झाल्यास भारतच पडणार चीनवर भारी; सैन्याने केलीय ‘अशाप्रकारे’ तयारी!
भारतीय रेल्वेचा चीनच्या कंपनीला मोठा झटका; ‘इतक्या’ कोटींचे कंत्राट केलं रद्द