Lockdown : राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन? विजय वडेट्टीवारांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 01:43 PM2021-04-09T13:43:01+5:302021-04-09T13:47:15+5:30
राज्यात भविष्यात संपूर्णत: लॉकडाऊन करावाच लागणार आहे. गर्दी टाळण्यासाठी रेल्वेवरही निर्बंध आणावे लागतील.
मुंबई - राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यात विकेंड लॉकडाऊनऐवजी तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. राज्यात आज रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदीला सुरुवात होणार आहे. शनिवारी आणि रविवारी दोन दिवसांचा कडक बंद करण्यात येत आहे. मात्र, सद्यस्थितीत हा विकेंड लॉकडाऊन उपयोगाचा नसून 3 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन करावाच लागेल, असे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
राज्यात भविष्यात संपूर्णत: लॉकडाऊन करावाच लागणार आहे. गर्दी टाळण्यासाठी रेल्वेवरही निर्बंध आणावे लागतील. कोरोनाची संपूर्ण परिस्थिती हाताळण्यासाठी आम्ही कितीही उपाययोजना केल्या, तरी मनुष्यबळ कमी पडणार आहे. डॉक्टर कमी पडतील, नर्स कमी पडतील हे आणणार कुठून. जी व्यवस्था, आता साडे पाच हजार डॉक्टर अंतिम परीक्षा पास होतील, त्यांना आम्ही कामाला लावतो. पीजी वाल्या विद्यार्थ्यांचीही सेवा आम्ही घेणार आहोत. आपल्याकडे यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळेच, विकेंडऐवजी कडक लॉकडाऊनची विनंती मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे, असे आपत्ती व विजय वडेट्टीवार यांनी सांगितल.
राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन केल्याशिवाय महाराष्ट्रात आपण निरपराध लोकांचे प्राण वाचवू शकत नाही. कारण, राज्यात कोविडचा स्पेड झालेला आहे. त्यामुळेच, आज तीन आठवड्यांचा लॉकडाऊन लावण्यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे, असे वडेट्टीवार यांनी टीव्ही 9 शी बोलताना म्हटले आहे. त्यामुळे, लवकरच राज्यात कडक लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे.
लोकलसेवाही बंद होणार?
सर्वसामान्यांचा रोजगार बुडत असल्याचे लक्षात घेऊन लोकल सर्वांसाठी खुली करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, मुंबई आणि परिसरात ज्या वेगाने करोना रुग्ण वाढत आहेत ते पाहता लोकलमधील गर्दी कमी करणे आवश्यक आहे. त्यातूनच लोकल पूर्ण बंद करावी की पूर्वी जसे कठोर निर्बंध घातले होते तसे पुन्हा घालावेत, यावर राज्य सरकार गंभीरपणे विचार करत आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.