Join us

मुंबईतील म्हशींच्या तबेल्यांवर लॉकडाऊनची वेळ; चारा, खुराक महागले; तर दुधाचे भाव उतरले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2020 4:15 AM

मुंबईतील जोगीश्वेरी, भिवंडी, कल्याण या भागात अनेक जातिवंत जाफराबादी म्हशींचे तबेले आहेत.

- यशवंत गव्हाणेकोल्हापूर : सकस आणि ताज्या दुधाच्या मागणीमुळे मुंबईसह उपनगरात शेकडो म्हशींचे तबेले वर्षांनुवर्षे सुरू आहेत. तबेल्यातून थेट ग्राहकांपर्यंत दूध अशी त्यांची नाळ आहे; परंतु आता याच भय्यांवर तबेलाच लॉकडाऊन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कारण एकच कोरोना व्हायरसमुळे देशात सुरू असलेले लॉकडाऊन. याचा परिणाम चारा, खुराकामध्ये पाच ते सात रुपये कृत्रिम भाव वाढ झाली आहे, तर दूध दर मात्र २० रुपयाने उतरुन ४० रु.लिटरवर आल्याने तबेलेवाले भय्या अक्षरश: मेटाकुटीला आला आहे.

मुंबईतील जोगीश्वेरी, भिवंडी, कल्याण या भागात अनेक जातिवंत जाफराबादी म्हशींचे तबेले आहेत. येथील म्हशीला लागणारा चारा गुजरातसह राज्यातील नाशिक , पुणे, बीड, अमरावती, अहमदनगर, जळगाव, सोलापूर आदी ठिकाणांहून पुरविला जातो; परंतु वाहतूकव्यवस्था बंद असल्याने ट्रकमालक रिटर्न भाडे नसल्याने दुहेरी भाडे तबेल्यावाल्यांकडून घेत आहेत. त्याचा परिणाम असा झाला की, पूर्वी गवताच्या पेंडींचा ट्रक वीस हजाराला मिळत असे, त्याला तब्बल ४० ते ४५ हजार रुपय मोजावे लागत आहेत.

मुंबई आणि उपनगरात १०० ते ७००० जातिवंत म्हशी असणारे शेकडो तबेले आहेत. यासाठी आवश्यक असणारे मजूर हे बहुतेक बिहार येथील आहेत. तेही कोरोनाच्या भीतीने आपल्या गावी निघून गेलेत, तर काहीजण वाहनाची वाट पाहत आहे. त्यामुळे तबेला मालकावर टांगती तलवार असणार आहे.

ऐन हंगामात नुकसान

उन्हाळ्याचा कडाका वाढला की बाजारात दूध, दही, ताक , लस्सी, बासुंदी, पनीर अशा दुग्धजन्य पदार्थांना प्रचंड मागणी असते. याचा काळात आइस्क्रीम व्यवसायकांची दुधाला भरपूर मागणी असते. त्यामुळे एप्रिल ते मे पर्यंत दुधाचा दर ७० लिटरपर्यंत जात असतो, पण सध्या बाजारच बंद असल्याने आणि लोक गावी गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे.

पशुखाद्याच्या दरात कृत्रिम झालेली वाढ आणि लॉकडाऊनमुळे दुधाचे घसरलेले दर याचा फटका तबेला मालकास बसत आहे.सध्या टोल बंद असून डिझेलचे भावही कमी असून शेतीमालाचाही तुटवडा नाही. त्यामुळे पशुखाद्यांच्या वाढलेल्या कृत्रिम दरावर सरकारने नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.- शामनाथ कदम, तबेला मालक , भिवंडी.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसदूध