मुंबई : लॉकडाऊन एकदम उघडला जाणार नाही, परंतु सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा महाआघाडी सरकारचा विचार आहे. याबाबतची नियमावली कॅबिनेटनंतर जाहीर करण्यात येईल, अशी माहिती मुंबई शहराचे पालकमंत्री व राज्याचे मत्स्य व्यवसाय, बंदर खात्याचे मंत्री अस्लम शेख यांनी दिली.
५० टक्के लसीकरण पूर्ण झाल्यावर लॉकडाऊन उठू शकतो अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली; पण सध्याच्या येणाऱ्या नवीन एसओपीप्रमाणे हॉटेल्स, इंडस्ट्री, सलून, इलेक्ट्राॅनिक्स व्यावसायिकांना दिलासा देण्यासंदर्भात टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे मंत्री अस्लम शेख यांनी स्पष्ट केले.
कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याने त्याची पूर्वतयारी म्हणून बाल चिकित्सागृह प्रत्येक कोविड सेंटरमध्ये आरक्षित करण्यात येत आहे. तसेच ब्लॅक फंगल्स, येलो फंगल्स यासंदर्भात आम्ही दक्षता घेऊन उपचार सुरू केलेले आहेत. तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत भरपाई देण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
--------