मुंबई: लॉकडाउनमध्ये विरंगुळा म्हणून केलेली ‘हाऊस पार्टी’ एका अल्पवयीन मुलाच्या जीवावर बेतली. अंधेरीत राहत्या इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरून पडून सतरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. गुरुवारी उशीरा रात्री हा प्रकार घडला असून त्यावेळी तो दारूच्या नशेत असल्याचे समजते. याप्रकरणी अंबोली पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
अंधेरीच्या चार बंगला परिसरात पार्थन या उच्चभ्रू इमारतीत पंधराव्या मजल्यावर शार्दुल (नावात बदल) हा मुलगा आई, वडील आणि स्वयंपाक्यासोबत राहत होता. कोरोनाच्या भीतीमुळे त्याला कोणी बाहेर सोडत नव्हते. त्यामुळे कंटाळून गुरुवारी त्याने घरातच नोकरसोबत पार्टी करण्याचे ठरविले. त्यांच्या घरी स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीला त्याने रात्री आठच्या सुमारास मद्याची सोय करायला सांगितली. त्यानुसार तो दारू घेऊन आला आणि शार्दुल त्याच्यासोबत रात्री उशिरापर्यंत मद्यप्राशन करत होता. याच नशेत रात्री एकच्या सुमारास तो गॅलरीत उभा राहिला आणि तोल जाऊन इमारतीच्या सातव्या मजल्यावर पडला. याबाबत स्वयंपाक्याने घरच्यांना सांगितले आणि त्यांनी शार्दुलला तातडीने स्थानिक रुग्णालयात हलविले. मात्र उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला.अपघाती मृत्यूची नोंद!त्याने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी सध्या फेटाळून लावली असली तरी सुसाईड नोट त्याने लिहिली होती का याची पोलीस चौकशी करीत आहेत. अपघाती मृत्यूची नोंद करत कूपर रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविल्याचे परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले.