कोरोना बाधित क्षेत्रातील ५ कारागृहे लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 12:49 PM2020-04-10T12:49:06+5:302020-04-10T12:49:49+5:30
कारागृहात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोना बाधित क्षेत्रातील कारागृहे तातडीने लॉकडाऊन करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
मुंबई : कारागृहात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोना बाधित क्षेत्रातील कारागृहे तातडीने लॉकडाऊन करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. या निर्णयानुसार राज्यातील मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह, व कल्याण जिल्हा कारागृह ही कारागृहे लाँक डाऊन करण्यात येत आहेत.
या संबंधित कारागृह अधीक्षकांनी कारागृहात अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक दोन शिफ्टमध्ये करावी. जे अधिकारी कर्मचारी कारागृहात काम करतील त्यांच्या भोजन व निवासाची व्यवस्था आतच करण्यात करण्यात यावी. मेन गेट हे लॉकडाऊन काळात पूर्णतः बंद राहील याची दक्षता घ्यावी. कारागृहात काम करणार्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाकडे कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दूरध्वनी व भ्रमणध्वनी नंबर देण्यात येतील. जर कुटुंबाला काही अडचण भासली त्यांनी वरिष्ठांकडे संपर्क साधावा. ज्यायोगे त्यांच्या अडीअडचणीचे निराकरण होईल. संबंधित कारागृहांना या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
------------------------------------
मास्क चा वापर आवश्यक व अनिवार्य
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे त्यामुळे राज्यातील सर्व जनतेने मास्कचा वापर करावा असे आवाहनही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यासह राज्यातील ज्या शहरांमध्ये व भागांमध्ये कोरोनाचा प्रभाव आढळून आला आहे, त्या ठिकाणी घराबाहेर पडताना मास्क चा वापर करणे अनिवार्य आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करून स्वतःचे व इतरांचे आरोग्य सुरक्षित ठेवावे, असे त्यांनी म्हटले आहे.