एसटीतील मोफत वायफाय सेवेचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:48 PM2017-11-17T23:48:03+5:302017-11-17T23:48:07+5:30
एसटी महामंडळाच्या वतीने मोठा गाजावाजा करीत सुरू केलेल्या मोफत वायफाय सेवेचा नांदेड विभागात पुरता बोजवारा उडाला आहे़ बहुतांश एसटीमध्ये बसविलेले वायफाय बंद असल्याने प्रवाशांच्या तक्रारी येत आहेत़ यामध्ये सर्वाधिक तक्रारी विद्यार्थी प्रवाशांकडून आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : एसटी महामंडळाच्या वतीने मोठा गाजावाजा करीत सुरू केलेल्या मोफत वायफाय सेवेचा नांदेड विभागात पुरता बोजवारा उडाला आहे़ बहुतांश एसटीमध्ये बसविलेले वायफाय बंद असल्याने प्रवाशांच्या तक्रारी येत आहेत़ यामध्ये सर्वाधिक तक्रारी विद्यार्थी प्रवाशांकडून आहेत़
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांच्या मनोरंजनासाठी राज्यभरातील एसटीमध्ये वायफाय बसविले़ परंतु, एसटी महामंडळाकडून दिल्या जाणाºया सुविधा किती दिवस टिकतील याबाबत खुद्द अधिकाºयांनाच गॅरंटी नसते़ त्याचप्रमाणे वायफाय सेवा बंद पडल्यात जमा आहे़ नांदेड विभागातील एकूण ४२५ गाड्यांमध्ये वायफाय बसविण्यात आले़ सदर वायफायची कनेक्टीव्हिटी ग्रामीण भागातील कानाकोपºयापर्यंत येत असल्याने प्रवाशांकडून वापरही त्याचप्रमाणात होवू लागला होता़ यात शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरीनिमित्त ये-जा करणारे प्रवाशांची संख्या अधिक होती़ परंतु, सदर सुविधा तीन महिन्यांतच बंद पडल्याने प्रवाशांच्या नशिबी पुन्हा निराशा आली आहे़
खासगी बस कंपन्याच्या स्पर्धेत टिकून एसटीची प्रवासीसंख्या वाढवण्याचे आव्हान महामंडळासमोर आहे़ अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आरामदायी बस तसेच दर्जेदार आणि मनोरंजनात्मक प्रवासाची सुविधा देण्यासाठी एसटीकडून वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या जात आहेत़ मनोरंजानासाठी सर्वच गाड्यांमध्ये वायफाय बसविले आहे़ प्रवास करीत असताना प्रवाशांना वेगवेगळ्या चित्रपट, गाणी पाहून मनोरंजन करता यावे तसेच प्रवासातील वेळेचा उपयोग घेता यावा यासाठी मोफत वायफाय सुविधा दिली़ परंतु, देखभालीअभावी तसेच कनेक्टीव्हिटीच्या अडचणी उद्भवत असल्याने या सुविधेचे तीनतेरा झाले आहेत़ शुक्रवारी दुपारी नांदेड बसस्थानकात उभ्या असलेल्या बहुतांश गाड्यांमधील वायफाय बंद होते़ ‘विनाडेटा मोबाइलवर सिनेमा’ ‘एसटीचा प्रवास, करमणूक हमखास’ अशा पद्धतीचे स्टिकर्स लावून प्रवाशांना आकर्षिक केले जाणार होते़ मात्र, तीन महिन्यांत एसटीमध्ये ना स्टिकर ना वायफाय सुविधा असे चित्र दिसत आहे़