VIDEO: मुंबईत टोळधाड; ताडदेव, वरळी, विक्रोळीत दिसले टोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 04:15 PM2020-05-28T16:15:44+5:302020-05-28T16:24:05+5:30
दक्षिण मुंबईतल्या काही भागांत दिसले टोळ
Next
मुंबई: आफ्रिकेतून निघालेली टोळधाड येमेन, इराण, पाकिस्तानमार्गे भारतात पोहोचली. देशातल्या अनेक राज्यांमधील पिकांचं नुकसान करणारी ही टोळधाड आता मुंबईत दाखल झाली आहे. विक्रोळी, ताडदेव, वरळी भागात मोठ्या संख्येनं पाहायला मिळत आहेत. त्याआधी राज्यातल्या तीन जिल्ह्यांना टोळधाडीचा मोठा फटका बसला. अमरावती, नागपूर, वर्ध्यात टोळधाडीनं शेतकऱ्यांचं काही प्रमाणात नुकसान झालं. गेल्या २७ वर्षांमधलं सर्वात मोठं टोळ संकट राज्यात पाहायला मिळालं.
मुंबईत पोहोचली टोळधाड; अनेक भागांत दिसले टोळ pic.twitter.com/pnw42vzQVw
— Lokmat (@MiLOKMAT) May 28, 2020
मुंबईतल्या विक्रोळी भागात मोठ्या संख्येनं टोळ पाहायला मिळाले. दक्षिण मुंबईतल्या ताडदेव, वरळीतही टोळ पाहायला मिळाले. तर गोरेगावमध्ये तुरळक संख्येनं टोळ दिसले. त्याआधी विदर्भातल्या अमरावती, वर्धा आणि नागपूरमध्ये टोळधाडीनं शेतकऱ्यांचं नुकसान झालं. नागपूरच्या काटोल, अमरावतीच्या मोर्शी, वरूडमध्ये टोळांची संख्या खूप जास्त होती. या टोळांनी तीन दिवसांत १२० किलोमीटर अंतर कापत विदर्भात शिरकाव केला.
'सोमवारी (२५ मे) सकाळी नागपूरच्या काटोलमध्ये सर्वप्रथम टोळ पाहायला मिळाले. मात्र यामध्ये पिकांचं फार मोठं नुकसान झालं. मान्सून अद्याप दाखल न झाल्यानं अनेक भागांमध्ये पेरण्यादेखील सुरू झालेल्या नाहीत,' अशी माहिती कृषी विभागाच्या नागपूर विभागाचे सहसंचालक रविंद्र भोसले यांनी दिली. महाराष्ट्रात येण्यापूर्वी टोळधाडीनं मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं.