धावत्या टॅक्सीत १४ वर्षांच्या गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अत्याचारानंतर नराधमांनी त्या मुलीला मालवणी भागात सोडले. याप्रकरणी सलमान शेख (२६) आणि टॅक्सीचालक प्रकाश पांडे (२८) या दोघांना अटक केली आहे.
पीडिच मुलीने दिलेल्या जबाबानुसार, घरात झालेल्या चेष्टा मस्करीच्या रागातून मुलीनं रात्री घर सोडले. मालवणीत राहणाऱ्या चुलत बहिणीच्या घरी ती निघाली. दक्षिण मुंबईत तिच्या घराजवळून सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास ती प्रकाश पांडेच्या टॅक्सीतून निघाली. पांडे तिला दादरला घेऊन गेला आणि तिथे सलमान शेख हा लॉजमालक टॅक्सित बसला. सलमानने तिच्या टॅक्सित लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर मुलीला मालवणी भागात सोडले. ही तरुणी परिसरात फिरत होती. पोलिसांची नजर तिच्यावर पडताच तिला ताब्यात घेत चौकशी केली. काही गैरप्रकार आढळून आल्याचा संशय येताच मुलीला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. सीसीटव्ही व तांत्रिक माहितीच्या मदतीने आरोपीला अटक केली गेली. आरोपीला मदत केल्याप्रकरणी पांडेलाही अटक करण्यात आली आहे.