लोढा-केसरकर यांच्यातील चढाओढीने सुगीचे दिवस? उभयतांकडून होणार विकासकामांच्या घोषणांचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 12:13 PM2023-10-13T12:13:51+5:302023-10-13T12:15:17+5:30
...परिणामी, भविष्यात मुंबईकरांवर आणखी घोषणांचा वर्षाव होईल, अशी चिन्हे आहेत.
मुंबई : उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पालिका मुख्यालयातून कारभार करण्यास सुरुवात केल्यानंतर मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनीही पालिका मुख्यालयाकडे आपला मोर्चा वळवला. पालिकेत बस्तान ठोकल्यानंतर नवनव्या योजनांची जंत्रीच त्यांनी सादर केली. त्यामुळे भविष्यात लोढा आणि केसरकर यांच्यात ‘विकासकामां’ वरून चांगलीच चढाओढ सुरू होईल, असे दिसते. परिणामी, भविष्यात मुंबईकरांवर आणखी घोषणांचा वर्षाव होईल, अशी चिन्हे आहेत.
शिंदे -ठाकरे गटातील संघर्षामुळे पालिका प्रशासनाने पालिकेतील सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यालयाला टाळे ठोकले आहे. साहजिकच सर्व पक्षीय नगरसेवकांचा पालिका मुख्यालयातील राबता थांबला आहे. त्यातून भाजपने खुबीने मार्ग काढला. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोढा यांच्यासाठी मुख्यालयात कार्यालय थाटले. नागरिकांच्या भेटीगाठी, प्रशासनाला सूचना, पेन्शन अदालत, आदी उपक्रम लोढा राबवत असतात. प्रशासनावर त्यांची बारीक नजर आहे. उत्सव काळात गणेशमूर्तींवर शिक्का मारण्याचा निर्णय मागे घेण्यास त्यांनी प्रशासनाला भाग पाडले होते. मलबार हिल जलाशयाच्या जागेबाबतही जनभावना लक्षात घेऊन त्यांनी सरकारकडे मागण्या केल्या आहेत.
पालिकेत चर्चा
केसरकर यांनीही विविध योजना जाहीर करून पालिकेत जोरदार पदार्पण केल्याची चर्चा रंगली आहे. मुंबई आय, मुंबादेवी, महालक्ष्मी, बाणगंगा, फॅशन स्ट्रीटचा विकास, कोळीवाड्यात पर्यटकांसाठी स्वतंत्र खोली, स्कायवॉकना सरकते जिने व लिफ्ट, फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र जागा, अशा विविध घोषणा त्यांनी केल्या आहेत.
निधीची करावी लागणार तरतूद
लोढा आणि केसरकर यांच्या संकल्पनेतील विकासकामे करण्यासाठी पालिका प्रशासनाला भविष्यात भरीव तरतूद करावी लागण्याची शक्यता आहे. शिवाय लोढा आणि केसरकर यांच्यातील ‘बॅलन्स’ सांभाळण्याची कसरत करावी लागेल, असे दिसते.