मनसुख हिरेन हत्या प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केलेल्या संतोष आत्माराम शेलार व आनंद पांडुरंग जाधव यांची एनआयए कोठडी पाच दिवसांनी वाढविण्यात आली आहे. वादग्रस्त माजी पोलीस एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मासाठी कार्यरत राहणाऱ्या दोघांकडील तपास पूर्ण न झाल्याने न्यायालयाने सोमवारी हा निर्णय घेतला.
मालाडमधील कुरार व्हिलेज परिसरात राहणाऱ्या दोघांना गेल्या रविवारी अटक केली होती. ते अनेक वर्षांपासून प्रदीप शर्मा याच्यासाठी काम करत आहेत. त्याच्या व या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सचिन वाझे याच्या सांगण्यावरून ते या कटात सहभागी झाले होते. त्यांच्या एनआयए कोठडीची मुदत २१ जूनला संपली. मात्र त्यांच्याकडील तपास प्रलंबित आहे. तसेच शर्मा व अन्य दोघांच्या समोरासमोर बसवून चौकशी करायची असल्याने एनआयएने कोठडीची मुदत वाढवून मागितली. त्यानुसार त्यांना २५ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे.