Join us

राज्यात लवकरच नवं राजकीय समीकरण; राज ठाकरे-शिंदे-फडणवीस बैठकीत काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 6:38 PM

राज ठाकरे यांची एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही बैठक झाल्याने महायुतीची चर्चा पुढे सरकल्याचं दिसत आहे. 

Lok Sabha Election ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणे दिवसागणिक बदलताना पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून नवीन मित्रपक्षांना सामावून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेना सध्या महायुतीच्या संपर्कात असून लवकरच त्यांचा महायुतीत समावेश होऊ शकतो. यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची घडामोड घडली असून आज सकाळी राजधानी मुंबईतील ताज लँड हॉटेलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बैठक पार पडली. मनसे महायुतीत सामील झाल्यानंतर किती आणि कोणत्या जागा सोडल्या जाव्यात, याबाबतची मागणी राज यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्याचे समजते.

राज ठाकरे यांनी नवी दिल्ली येथे नुकतीच भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये युतीबाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले होते. तसंच पुढील दोन दिवसांत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असंही नांदगावकर यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता राज ठाकरे यांची एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही बैठक झाल्याने महायुतीची चर्चा पुढे सरकल्याचं दिसत आहे. 

महायुतीकडून जागावाटपात मनसेला दोन लोकसभा मतदारसंघ सोडले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये दक्षिण मुंबई आणि शिर्डी या जागांचा समावेश असू शकतो. या दोन जागांसह राज ठाकरे यांनी अन्य काही मुद्द्यांबाबत आजच्या बैठकीत शिंदे-फडणवीसांसोबत चर्चा केली. निवडणुकीला सामोरे जाताना कोणत्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करायचे, महाविकास आघाडीकडून होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी काय प्रकारची रणनीती हवी, याबाबतही आजच्या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती आहे.

मध्यरात्रीही झाली भेट?

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मध्यरात्री अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. देवेंद्र फडणवीस बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास मुंबई विमानतळावर दाखल झाले होते. तर, त्याच वेळेत राज ठाकरे हे शिवतीर्थ बंगल्यातून बाहेर पडल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं होतं. त्यानंतर दोन्ही नेत्यांची अज्ञातस्थळी भेट झाल्याचे समजते.  

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४राज ठाकरेएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीस