Join us

लोकसभा मतदारसंघनिहाय बैठकींचे सत्र मातोश्रीत सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 1:08 AM

आगामी लोकसभानिहाय बैठकींचे सत्र सध्या मातोश्रीत सुरू असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वत: राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघनिहाय शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- मनोहर कुंभेजकरमुंबई : आगामी लोकसभानिहाय बैठकींचे सत्र सध्या मातोश्रीत सुरू असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वत: राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघनिहाय शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आगामी लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी सध्या मातोश्रीत मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघासह राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका उद्धव ठाकरे घेत आहेत. मुंबईतील विभागप्रमुख, आमदार, उपविभागप्रमुख, नगरसेवक आणि शाखाप्रमुखांच्या बैठकींचे सत्र सध्या मातोश्रीत सुरू आहे. नुकतीच मातोश्रीत ईशान्य मुंबईतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत युती झाल्यास इशान्य मुंबई मतदारसंघातून सोमय्या नको, अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. सोमय्या यांना उमेदवारी दिल्यास शिवसैनिक त्यांच्यासाठी प्रचार करणार नाहीत, असे शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मी शिवसेनेच्या सर्व खासदारांशी बैठकीत व खासगीत बोललो. प्रसिद्धी माध्यमांमध्ये जरी उलट सुलट बातम्या येत असल्या, तरी एकाही खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, नगरसेवक ते अगदी शाखाप्रमुखानेसुद्धा मला युती करा, असे सांगितले नाही. त्यामुळे शिवसेनेचा सन्मान हा ठेवलाच पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत सांगितले.

गेली साडेचार वर्षे जरी शिवसेना भाजपाबरोबर सत्तेत असली, तरी शिवसेनेला भाजपाकडून मिळालेल्या वागणुकीमुळे शिवसेना ही दुखावलेली आहे. त्यामुळे सन्मानाने युती झाली, तर ठिक अन्यथा जे होईल ते होईल, असे सांगत शिवसेना स्वबळावर लढण्यास सज्ज असून, भाजपाला धडा शिकविण्याची ठाम भूमिका त्यांनी या बैठकीत पदाधिकाºयांसमोर मांडली.सन्मानाने युती व्हावी!

गेल्या वर्षी २३ जानेवारीला शिवसेना आगामी निवडणूक स्वबळावर लढले, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वरळी येथे झालेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात केली होती. उद्धव ठाकरे हे अजून त्यांच्या भूमिकेवर ठाम असून, जर सन्मानाने युती झाली, तर ठीक अन्यथा शिवसेना स्वबळावर लढण्यास सज्ज असल्याचे संकेत त्यांनी मातोश्रीत शिवसेना पदाधिकाºयांच्या बैठकीत दिले.

टॅग्स :मुंबईलोकसभा निवडणूक २०१९शिवसेनाभाजपा