Join us

उर्मिला मातोंडकर यांच्या नव्या इनिंगला 'मनसे' शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 11:10 AM

उर्मिला मातोंडकर यांच्या नव्या इनिंगला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शुभेच्छा दिल्या आहेत. 

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून रंगीला गर्ल अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना मुंबई उत्तर मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. उर्मिला मातोंडकर यांच्या नव्या इनिंगला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शुभेच्छा दिल्या आहेत. 'महिलांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना-समस्यांना आवाज फोडण्यासाठी तुझ्यामुळे मदत होईल, याची खात्री आहे. तुझ्या या नव्या इनिंगला 'मनसे' शुभेच्छा!'

मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून रंगीला गर्ल अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना मुंबई उत्तर मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाच्या गोपाळ शेट्टी यांचे उर्मिला यांच्यासमोर खडतर आव्हान आहे. परंतु, मुंबई उत्तर मधील ही लढत मराठीविरुद्ध अमराठी अशीच रंगणार असल्याचे चित्र आहे. उर्मिला मातोंडकर यांच्या नव्या इनिंगला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शुभेच्छा दिल्या आहेत. 

'स्वतः तील अंगभूत अभिनयगुणांच्या जोरावर एक अभिनेत्री म्हणून तू स्वतः चा स्वतंत्र ठसा बॉलीवूडवर उमटवलास. अनेक उत्तमोत्तम सिनेमे तुझ्या वाट्याला आले आणि मिळालेल्या प्रत्येक संधीचं तू सोनं केलंस. आज काँग्रेसने उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून तुझं नाव जाहीर केलंय. राजकारणात सक्रिय होण्याचा हा निर्णय तू निश्चितच संपूर्ण विचारांती घेतला असशील. या निवडणुकीच्या निमित्ताने तुझ्यासारखं एक संवेदनशील व्यक्तिमत्व राजकारणात आल्याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे. महिलांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना-समस्यांना आवाज फोडण्यासाठी तुझ्यामुळे मदत होईल, याची खात्री आहे. तुझ्या या नव्या इनिंगला 'मनसे' शुभेच्छा!' अशाप्रकारे मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

'मी मुंबईकर आहे' याचं मला कोणालाही प्रमाणपत्र देण्याची गरज नाही – उर्मिला मातोंडकर

उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून, त्या मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. आता त्यांच्यावर भाजपा नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे. त्यावर उर्मिला यांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. ‘मी मुंबईकर आहे’ आणि याआधीही होती आणि यापुढेही राहणार आहे, याबाबत मला कोणालाही प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. मी स्टार म्हणून ही निवडणूक लढवीत नाही. आपल्या लोकशाहीमध्ये संपूर्ण जनता हीच खरी स्टार आहे. मी काँग्रेसची विचारधारा घेऊन ही निवडणूक लढणार आहे. एक चांगला विचार घेऊन मी या क्षेत्रात उतरलेली आहे, असं उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे. 'मुंबईमध्ये उत्तर मुंबई हा एक खूप चांगला आणि सुंदर विभाग बनवून दाखवायचा आहे. मला कोणावरही आरोप करायचे नाही आहे. मला ही निवडणूक प्रेमाने आणि मोठ्या मनाने लढवायची आहे, द्वेषाचे राजकारण मला करायचे नाही. निवडणुकीनंतरही मी काँग्रेस पक्षासोबत असणार आहे' असे उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे.

2004 च्या लोकसभा निवडणुकीत अभिनेता गोविंदला काँग्रेसने उत्तर मुंबईतून तिकीट दिले होते, त्यांनी उत्तर प्रदेशचे विद्यमान राज्यपाल आणि माजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांचा पराभव केला होता. 2014 साली झालेल्या निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांनी उत्तर मुंबई मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. या मतदारसंघात उत्तर भारतीय आणि गुजराती मतदारांची संख्या लक्षणीय असून, ते भाजपाचे पारंपरिक मतदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात गोपाळ शेट्टींना आव्हान देण्यासाठी काँग्रेसकडून ग्लॅमरस चेहऱ्याचा शोध सुरू होता. आसावरी जोशी, शिल्पा शिंदे यांच्यां नावांचीही उत्तर मुंबईतून उमेदवारीसाठी चाचपणी झाली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांनी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांचा 4 लाख 46 हजार मतांनी पराभव केला होता. 

 

टॅग्स :उर्मिला मातोंडकरकाँग्रेसलोकसभा निवडणूकमनसे