मुंबई - लोकसभा निवणुका २०१९ चा प्रचार शिगेला पोहोचला आहे. राज्यातील चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यात मुंबई आणि ठाण्यात २९ एप्रिलला मतदान होणार आहे. शेवटचा एक आठवडाच राहिला असून आता प्रचार जरा जास्तच रंगतदार झाला आहे. सर्वपक्षीय नेते प्रचाराच्या रणधुमाळीत गुंतले आहेत. अधिकाधिक जनसंपर्क वाढवण्याकडे कल दिसतो आहे. तर प्रचाराच्या अनेक शक्कला लढविणे सुरू आहे. सर्व पक्षीय उमेदवार आणि नेतेमंडळी विविध समाजाच्या प्रतिनिधींशी बैठका आणि मॅरेथॉन बैठका घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक मात्तबर नेत्यांच्या जंगी सभा ठिकठिकाणी आयोजित केल्या गेल्या असून हे सत्र सुरूच आहे.
उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्राला निवडणुकीचा महत्त्वाचा सामना म्हणून बघितला जात आहे. या मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार गोपाळ शेट्टी, काँग्रेसतर्फे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हे दोन महत्वाचे चेहेरे रिंगणात आहेत. गोपाळ शेट्टी यांच्या प्रचारासाठी आता खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत. २४ एप्रिलला अशोक वन, दहिसर पूर्व येथे महायुतीची भली-मोठी जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी मागाठाणे विधानसभा क्षेत्रात मोठी लगबग सुरू झाली आहे.
आजपर्यंत गोपाळ शेट्टी यांच्या प्रचारासाठी महायुतीच्या मुंबईतील पहिल्या विक्रमी मेळाव्यात गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल, केंद्रीय दूरसंचार आणि रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा, भाजप दिल्ली प्रदेश अध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी, केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी, महाराष्ट्र भाजप प्रवक्ता शायना एन.सी आदी मातब्बर मंडळी येऊन गेली आहेत.