Join us

PMपदाबाबत शरद पवारांचं मोठं विधान, विरोधकांच्या महाआघाडीसाठी तय्यार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2018 11:39 AM

Lok Sabha Election 2019: राष्ट्रीय राजकारणाचा दांडगा अनुभव आणि सर्वच पक्षांशी सलोख्याचे संबंध असल्यानं शरद पवार हे पंतप्रधानपदाचे 'पॉवरफुल्ल' दावेदार मानले जातात.

मुंबईः देशाच्या राजकारणात जेव्हा-जेव्हा तिसऱ्या आघाडीची चर्चा झालीय किंवा होते, तेव्हा पंतप्रधानपदासाठी एकच नाव पुढे येतं आणि ते म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार... २०१९च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधकांची महाआघाडी करण्याच्या हालचालींना वेग आलेला असतानाही, 'पवारसाहेब' पंतप्रधान होऊ शकतात बरं, असं त्यांचे समर्थक हळूच सांगतात. परंतु, आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचं आज पवारांनी स्वतःच स्पष्ट केलं आहे.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला जाईल, अशी सावध खेळी काँग्रेसनं केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या गळ्यात पंतप्रधानपदाच्या उमेदवारीची माळ त्यांनी घातलेली नाही. निकालांनंतर पक्षीय बलाबल आणि जागांचं समीकरण मांडून पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित केला जाणार आहे.  स्वाभाविकच, या पदाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे आणि त्यात शरद पवार यांचं नावही आहेच. राष्ट्रीय राजकारणाचा दांडगा अनुभव आणि सर्वच पक्षांशी सलोख्याचे संबंध असल्यानं पवार हे पंतप्रधानपदाचे 'पॉवरफुल्ल' दावेदार मानले जातात. मात्र, पवारांनी वेगळंच मत मांडून आपल्या समर्थकांना काहीसं नाराज केलं आहे. 

माझा पक्ष देशभरात ३० ते ३५ जागा लढवतो. त्यातील निम्म्या जागा जिंकू शकतो. तेवढ्या खासदारांवर कुणी देशाचा पंतप्रधान व्हायचं स्वप्न पाहत असेल तर त्याला वास्तवाचं भान आहे असं म्हणता येणार नाही, अशी सूचक प्रतिक्रिया पवारांनी दिली.

मी, यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा मिळून विरोधकांची मोट बांधू शकतो, कारण आम्हालाही तिघांनाही पंतप्रधानपदाची इच्छा नाही, ते आमचं ध्येय नाही, अशी भूमिका शरद पवार यांनी 'हिंदुस्थान टाइम्स' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मांडली आहे. आम्ही तिघांनी मिळून विरोधकांना एकत्र आणायला हवं, देशभरात फिरून जनतेमध्ये विश्वास निर्माण करायला हवा, म्हणजे २०१९च्या निवडणुकीत भाजपाला एक तगडा पर्याय उभा राहू शकेल, असं पवारांनी नमूद केलं.

आजच्या राजकीय परिस्थितीची तुलना शरद पवारांनी १९७५ ते ७७ या काळातील परिस्थितीशी केली. त्या काळी प्रसारमाध्यमं, सरकार आणि सरकारी यंत्रणांवर इंदिरा गांधींचं नियंत्रण होतं, तसंच आज नरेंद्र मोदींचं आहे. त्या काळातही जनतेला सक्षम पर्याय दिसत नव्हता. इंदिरा गांधींना टक्कर देऊ शकेल असा नेता नव्हता. परंतु, तेव्हा जयप्रकाश नारायण होते. अनेक राजकीय नेत्यांना पक्षीय मतभेद विसरायला लावून त्यांनी एकत्र आणलं होतं आणि जनता पक्षाची सत्ता स्थापन झाली होती. आज तसं काम करायला हवंय. ते मी, सोनिया गांधी आणि देवेगौडा करू शकतो आणि मोदी सरकारला पर्याय निर्माण करू शकतो, असं मत शरद पवारांनी मांडलं. राष्ट्रीय पातळीवर महाआघाडी स्थापन करण्यापेक्षा राज्य स्तरावर आघाडीची घडी बसवण्यावर लक्ष केंद्रीत करणं अधिक फायद्याचं असल्याचंही ते म्हणाले. त्यादृष्टीने काही नेत्यांशी चर्चा केली असून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचंही त्यांनी सूचित केलं. 

लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर न करण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेचं त्यांनी स्वागत केलं. तसंच, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुधारणा होत असल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं. 

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०१९शरद पवारनरेंद्र मोदीकाँग्रेस