राज ठाकरेंच्या सभेत मोदींच्या भाषणांसाठी दोन स्क्रीन, काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी करणार 'बॅटिंग'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 07:09 PM2019-04-05T19:09:20+5:302019-04-05T19:15:56+5:30
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच राज ठाकरेंच्या निशाण्यावर असतील, हे पक्कं आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. मनसेच्या मेळाव्यात 'राज'गर्जना होणार असल्याची दणदणीत जाहिरात पक्षाने केलीय. स्वाभाविकच, मनसैनिकांची आणि राजकीय वर्तुळात उत्सुकता ताणली गेलीय. राज ठाकरेंच्या सभेसाठी शिवाजी पार्कवरही जोरदार तयारी सुरू आहे. स्टेजवर राज यांच्यासाठी जे पोडियम आहे, त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला दोन मोठे पडदे असतील. हे पडदे खास पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणांसाठी लावण्यात आल्याची चर्चा आहे. गेल्या दोन भाषणांमध्ये राज ठाकरेंनी मोदींच्या जुन्या भाषणांच्या क्लिप दाखवल्या होत्या. तशीच मोदींची आणखी काही भाषणं उद्या ऐकायला मिळू शकतात.
मनसे लोकसभेची निवडणूक लढवणार नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र त्याचवेळी, मोदींच्या विरोधात काम करण्याचे आदेश त्यांनी मनसैनिकांना दिलेत. यापुढे ज्या सभा घेईन, त्या मोदी-शहांच्या विरोधात असतील, असंही त्यांनी जाहीर केलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही प्रमुख उमेदवारांसाठी राज त्यांच्या-त्यांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेणार असल्याचंही निश्चित झालंय. त्यामुळे मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच राज ठाकरेंच्या निशाण्यावर असतील, हे पक्कं आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर पुढचे दहा दिवस नरेंद्र मोदी सुटाबुटात, हसत कसे फिरत होते, त्याचे दहा फोटो राज ठाकरेंनी आपल्या भाषणात दाखवले होते. जवानांपेक्षा व्यापारी जास्त रिस्क घेतात, असं मोदी एका कार्यक्रमात म्हणाले होते. तो व्हिडीओ दाखवून राज यांनी त्यांना लक्ष्य केलं होतं. पुलवामासारखा आणखी एखादा हल्ला घडवला जाऊ शकतो, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यासोबतच, शरद पवारांबद्दलची मोदींची भाषा कशी बदलली, याचे व्हिडीओही त्यांनी दाखवले होते.
आता तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील दोन्ही प्रचारसभांमध्ये थेट शरद पवार यांच्यावर वार केलेत. पुतण्यानेच पवारांची 'दांडी गुल' केली, देशातील हवा पाहूनच पवारांनी निवडणुकीतून माघार घेतली, अशी टोलंदाजी मोदींनी केली होती. त्यामुळे आता राज ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी कशी बॅटिंग करतात, मोदींची कुठली भाषणं ऐकवतात, मनसैनिकांना काय रणनीती सांगतात, हे पाहणं औत्सुक्याचं आहे.
#मनसे#पाडवामेळावा#राजठाकरे#RajThackeray#Gudhipadwa2019pic.twitter.com/xl6n70s5ts
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) April 1, 2019