'मोदी है तो मुमकिन है' जाहिरातीची राज ठाकरेंकडून पोलखोल, संपूर्ण कुटुंब मनसेच्या व्यासपीठावर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 09:21 PM2019-04-23T21:21:44+5:302019-04-23T21:25:22+5:30
भाजपाकडून एका कुटुंबाचा फोटो टाकत आम्ही कशी गरिबी हटवली ह्याचा प्रचार केला. हे संपूर्ण कुटुंब मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यासपीठावर आणून भाजपाची पुन्हा एकदा पोलखोल केली.
मुंबई - मोदी है तो मुमकिन है म्हणत मोदी फॉर न्यू इंडियाच्या फेसबुक पेजवर भाजपाकडून एका कुटुंबीयांचा फोटो वापरत खोटी जाहिरात करण्यात आली. भाजपाकडून एका कुटुंबाचा फोटो टाकत आम्ही कशी गरिबी हटवली ह्याचा प्रचार केला. हे संपूर्ण कुटुंब मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यासपीठावर आणून भाजपाची पुन्हा एकदा पोलखोल केली. तसेच अशा किती कुटुंबीयांचा वापर केला असेल, किती खोटा प्रचार करणार तुम्ही? असा सवाल राज ठाकरे यांनी भाजपाला विचारला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील पहिली सभा काळाचौकी येथे पार पडली. त्यामध्ये राज ठाकरे बोलत होते.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, भाजपावाले माझे काँग्रेस-राष्ट्रवादीचे वाभाडे काढलेले व्हिडीओ बाहेर काढत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होते, त्यावेळी ते चुकले म्हणून त्यांचे वाभाडे काढले, आता हे सत्तेत हे वाट लावत आहेत, म्हणून ह्यांचे वाभाडे काढत आहेत, माझ्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं भाजपाकडे नाहीत म्हणून अशाप्रकारे भाजपाकडून टीका करण्यात येत आहे.
सध्याच्या भाजपचे मूळपुरुष नरेंद्र मोदी हे इतकं खोटं बोललेत की भाजपच्या लोकांनाच कळत नाहीये की ह्याला तोंड कसं द्यायचं. भाषणांमध्ये २,३ दिवसांची गॅप घेतली, म्हणलं मुख्यमंत्र्यांना जरा झोप घेऊ देत. मुख्यमंत्री पण भांबावलेत, त्यांना काही कळत नाहीये की ह्याला कशी उत्तर द्यायची असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाला लगावला.
मुकेश अंबानी आणि उदय कोटक हे देशातील अग्रणी उद्योगपती जाहीरररीत्या दक्षिण मुंबईत मिलिंद देवरा ह्यांना मतदान करणार आहे म्हणजे काँग्रेसला मतदान करणार आहे हे जर जाहीरपणे सांगत असतील ह्यावरून देशात भाजपचं/मोदींच सरकार येणार नाही हे निश्चित आहे. गुजरातच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालांकडे पाहिलं आणि त्याची तुलना जर २०१४च्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला यश मिळालं त्यानुसार त्यांना १६५ जागा मिळायला हव्या होत्या पण त्यांना ९९ जागाच मिळाल्या. मोदींच्या राज्यात जर त्यांचा जागा कमी होत असतील तर वारं कधीपासून बदलू लागलंय असंही राज ठाकरेंनी सांगितले.