लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी (29 एप्रिल) पार पडले. मुंबईतील सहा मतदारसंघात मोठ्या उत्साहात मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच मतदान करणाऱ्या नवमतदारांचा जोश पाहायला मिळाला. कॉलेजचा पहिला दिवस, पहिली भेट अशा अनेक गोष्टी तरुणाई सोशल मीडियावर शेअर करते. त्यामुळेच पहिल्यांदा मतदान केलं आणि सेल्फी काढला नाही असं होणारच नाही. आपलं अमूल्य मत दिल्यानंतरचे फोटो फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर टाकण्यात तरुणाई आघाडीवर होती. सोमवारी दिवसभर फेसबुक प्रोफाइल, पोस्ट, व्हॉट्सअॅप, ग्रुप स्टेटसवर फक्त मतदानाचीच चर्चा रंगली. मतदान करा, फरक पडतो, सेल्फी विथ वोट, माझं मत विकासाला असं म्हणत पहिल्यांदा मतदान केल्याचा आनंद नवमतदारांनी साजरा केला.
सोशल मीडिया हे व्यक्त होण्याचं प्रभावी माध्यम आहे. विविध उत्सव नेटवर साजरे करणाऱ्या नेटिझन्सनी मतदानाचा हा उत्सवही मोठ्या जल्लोषात साजरा केला. सेल्फी काढण्यासोबतच एकमेकांना मतदान करण्याचं आवाहनही केलं. तरुण पिढी ही वोट बँक असल्याने त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी यंदा सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला. LokSabhaElections2019, देशकामूड असे हॅशटॅग ट्रेडींगमध्ये आहेत. भाडिपाच्या विषय खोल आणि लोकमंच या कार्यक्रमातून तरुणाईच्या मनातले प्रश्न थेट नेत्यांना विचारले गेले. मतदान नाही केलं तर काय फरक पडतो असं म्हणणाऱ्यांनी निदान एका सेल्फीसाठी तरी मतदान करा असा सल्ला अनेकांनी दिला. पहिलं मत आणि सेल्फी काढणाऱ्या नवमतदारांना मतदानानंतर काय वाटतं ते जाणून घेऊया....
पहिलं मत हे आनंदचं आणि जबाबदारीचं
पहिल्यांदा मतदान करणे ही जितकी आनंदाची गोष्ट होती तितकीच जबाबदारीची देखील होती. मतदानाची सुट्टी वाया घालवण्यात काही अर्थ नाही त्यामुळेच मतदान करून ती सत्कारणी लावली. फक्त एक सेल्फी काढण्यासाठी नाही तर देशाच्या दृष्टीने काय योग्य असेल याचा विचार करून मतदान केले आहे.
- पौर्णिमा कोळी, गुरूनानक खालसा कॉलेज.
सेल्फी काढून मतदानाचा आनंद केला साजरा
पहिल्यांदा मतदान करणार असल्याने खूप उत्सुकता होती. मतदान केल्यावर छान वाटलं. सेल्फी विथ वोट म्हणजेच मतदानानंतर सेल्फी काढून पहिल्यांदा मतदान केल्याचा क्षण कॅप्चर केला आहे. पक्ष पाहून नाही तर उमेदवार पाहून मतदान केले आहे. मतदान केल्यानंतर सामाजिक जबाबदारीची खऱ्या अर्थाने जाणीव झाली आहे.
- पवन शेट्टी, SIES कॉलेज.
मतदान केल्याचा अभिमान
पहिल्यांदा मतदान करणं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. माझ्या एका मतामुळे का होईना पण देशाच्या प्रगतीमध्ये खारीचा वाटा मतदान करून उचलला याचा अभिमान आहे. मतदान केल्याचा फायदा हा नागरिकांचे भवितव्य ठरवण्यासाठी होणार आहे. सेल्फी काढून मतदानाचा आनंद साजरा करताना खूप भारी वाटलं.
- रचना तलोस्कर, जोशी-बेडेकर कॉलेज.
माझं मत हे देशाच्या प्रगतीसाठी आणि शांततेसाठी
मी पहिल्यांदा मतदान केलं. माझं मत हे देशाच्या प्रगतीसाठी आणि शांततेसाठी आहे. देशाच्या प्रगतीसाठी मतदान करणं गरजेचं असल्याने सर्वच गोष्टीचे भान ठेवून मतदान केलं. पहिल्यांदा मतदान केल्याने तो आनंदाचा क्षण होता.
- सुहास साबळे, खालसा कॉलेज.
मतदान केल्यावर एक सेल्फी तो बनता है!
देशाचा विकास आणि राजकारण यावर आधी फक्त चर्चा करत होतो मात्र आता 18 वर्ष पूर्ण झाल्यामुळे मतदानाचा हक्क बजावल्याचा आनंद आहे. पहिल्यांदा मतदान केल्यावर खूपचं चांगलं वाटलं. देशाच्या विकासात आता आपलाही हातभार लागणार यामुळे मी खूप खूश आहे. आयुष्यात पहिल्यांदा केलेल्या सर्वच गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे पहिल्यांदा मतदान केल्यानंतर एक सेल्फी तो बनता है!
- आदेश कुदळे, वसंतदादा पाटील इंजिनिअरींग कॉलेज.