Join us

मुंबईतील मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सहा सायकलपटूंची दिल्लीला वारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2019 1:38 PM

“मतदान हा केवळ अधिकार नसून आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे” या भावनेला उजाळा देत सहा सायकलपटूंनी बुधवारी (3 एप्रिल) दिल्लीकडे प्रस्थान केले आहे.

ठळक मुद्दे“मतदान हा केवळ अधिकार नसून आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे” या भावनेला उजाळा देत सहा सायकलपटूंनी बुधवारी (3 एप्रिल) दिल्लीकडे प्रस्थान केले आहे. मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी हुतात्मा चौकात या सहा साहसी वीरांना शुभेच्छा दिल्या.मुंबई येथून सकाळी सात वाजता यांची सायकल वारी निघाली असून गुजरात, राजस्थान मार्गे एकूण 1440 किमी प्रवास (रीले फॉर्मेट ने) 72 तासांत पूर्ण करणार आहेत.

मुंबई - “मतदान हा केवळ अधिकार नसून आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे” या भावनेला उजाळा देत सहा सायकलपटूंनी बुधवारी (3 एप्रिल) दिल्लीकडे प्रस्थान केले आहे. मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी हुतात्मा चौकात या सहा साहसी वीरांना शुभेच्छा दिल्या आहेत. या वेळी नाशिक सायकलिस्टचे प्रमुख बैजल, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिवडी विधानसभा मतदारसंघ बाळा वाघचौरे तसेच नाशिक सायकलिस्टचे काही सदस्य हे उपस्थित होते.

मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सहा सायकलपटूंचा हा अभिनव उपक्रम अभिनंदनीय आहे. मतदान वाढीसाठी युवावर्गाने पुढाकार घ्यावा, वेगवेगळे उपक्रम राबवायला हवेत. मतदानाच्या दिवशी व आधी जरी सुट्टी असली तरी, मतदान करूनच सुट्टीचा आनंद घ्यावा, असे आवाहन जोंधळे यांनी यावेळी केले आहे. रवींद्र दुसाने, चंद्रकांत नाईक, मोहन देसाई, राजेंद्र गुंजाळ, श्रीराम पवार व सुरेश डोंगरे हे सहा सायकलिस्ट मतदान करण्याचे नागरिकांना आवाहन करत दिल्लीपर्यंत सायकलने जात आहेत. मार्गात येणाऱ्या जनतेला ते मतदान करण्याची शपथ घालणार आहेत. शिवाय इतर सामाजिक संदेशांचे पण ते आवर्जून प्रबोधन करणार आहेत.

बुधवारी हुतात्मा चौक, फोर्ट, मुंबई येथून सकाळी सात वाजता यांची सायकल वारी निघाली असून गुजरात, राजस्थान मार्गे एकूण 1440 किमी प्रवास (रीले फॉर्मेट ने) 72 तासांत पूर्ण करणार आहेत. त्यानंतर शनिवारी 6 एप्रिलला सकाळी सात वाजता अमर जवान ज्योत, इंडिया गेट, दिल्ली येथे हे सहा सायकलिस्ट गुढी उभारणार आहेत. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मुंबईतील गेल्या वर्षीच्या मतदानाची आकडेवारी बघता राष्ट्रीय सरासरीपेक्षा आपली मतदान टक्केवारी कमी असुन मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी लक्षात घेता मतदान टक्केवारी वाढण्यासाठी हा प्रयत्न चांगला आहे. पण मुंबईतील मतदान टक्क्याचे कमी असलेले प्रमाण लक्षात घेता, हाच मुद्दा नेमका हेरून नाशिक सायकलिस्टचे हे सदस्य असे अनोखे मतदान जनजागृती अभियान राबवित आहेत.

टॅग्स :मुंबईदिल्लीलोकसभा निवडणूक