मुंबई : महायुतीच्या जागावाटपाचा फार्म्युला अखेर निश्चित झाला आहे. नाशिक, ठाण्याची जागा अखेर शिंदे सेनेकडे गेली तर पालघर भाजपकडे. त्यामुळे भाजप- शिंदेसेना आणि अजित पवार गट महायुतीच्या २८-१५-५ या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब झाले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेतलीय. या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नाशिकची जागा ही शिंदेसेनेकडे राहील, तर पालघरच्या जागेचा निर्णय भाजप घेणार आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले. त्यामुळे ४८ पैकी २८ जागा भाजप, १५ शिंदेसेना तर आपल्या कोट्यातून रासपला १ जागा देत अजित पवार गट चार जागा लढवणार आहे.
शिंदेसेनेकडे विद्यमान १३ खासदार असतानाही जास्तीच्या दोन जागा मिळविण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आले आहे, तर २०१९ मध्ये शिवसेनेसोबत महायुतीत असताना भाजपने २५ जागांवर लढणार आहे. मात्र, शिंदेसेना आणि अजित पवार गटासोबतच्या युतीनंतरही अतिरिक्त ३ जागा मिळवत, भाजप २८ जागा लढवणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच भाजप एवढ्या जागा लढवणार आहे. महायुतीच्या जागावाटपात अडचणीच्या बनलेल्या ठाणे, कल्याण आणि नाशिक या तीन जागांचा तिढा महाराष्ट्रदिनी सुटला. महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू झाली, तेव्हा भाजप ३०-३२ हून अधिक जागा लढेल, असे म्हटले जात होते. आपल्याकडे असलेल्या खासदारांच्या संख्येपेक्षा दोन जागा अधिक मिळविणे शिंदे यांना यश आले.
महाविकास आघाडीत उद्धवसेना वरचढ ठरली आहे. आघाडीत हा पक्ष सर्वाधिक २१ जागा लढवत असला, तरी २०१९च्या तुलनेत त्यांना २ जागा कमी मिळाल्या. भाजपनंतर सर्वाधिक जागा उद्धव सेनेला मिळाल्या आहेत. त्यानंतर, काँग्रेसला १७ तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला १० जागा मिळाल्या आहेत.
नाशिकमध्ये गोडसेच
अनेक पर्यायांवर विचार करून शिंदेसेनेने अखेर विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच मैदानात उतरविले आहे. सातारा भाजपला दिल्यानंतर अजित पवार गट नाशिकची जागा मिळवू शकला नाही.
ठाण्यात नरेश म्हस्के
ठाण्यातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र
डॉ. श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधून उमेदवारी देण्यात आली आहे.