अश्विन महाजन
Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पाचव्या टप्प्याचे मतदान आज सकाळपासून सुरु झाले. या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघांचाही समावेश आहे. मुंबईत अनेक मतदारसंघात बूथवर इव्हीएम बिघडल्याच्या घटना घडल्या. तर अनेक बूथवर मतदानाला उशीर होत असल्याचा आरोप झाला. काही ठिकाणी मतदारांची गर्दी झाली नाही तर काही ठिकाणी मतदारांची मोठी गर्दी झाली होती. मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातील वांद्रे पुर्व परिसरातील नवजीवन विद्या मंदीर या मतदान केंद्रावर एका आजोबांनी सर्वांचे लक्ष वेधले.
या आजोबांचं नाव माहित नाही, वय माहित नाही, या मतदाराला काय झालं हेही माहिती नाही. पण या मतदारांचा उत्साह सांगितला तर तुम्ही देखील अचंबित व्हाल. मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातील वांद्रे पुर्व परिसरातील नवजीवन विद्या मंदीर या मतदान केंद्रावर हे आजोबा मतदानासाठी आले. ते आले मतदानासाठी आत गेले. पण तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी ओळखपत्रच आणलेलं नाही. त्यांना बोलताही येत नव्हते. त्यांच्यासोबतही कुणी आलेले नव्हते. त्यामुळे ते राहतात कुठे याची माहितीदेखील नव्हती. व्हिलचेयरवर बसून ते केवळ खाणाखुणा करत होते. ते आता घरी जातील अन् पुन्हा काही येऊ शकत नाहीत, असं वाटत होतं पण थोड्या वेळानंतर तेच आजोबा पुन्हा मतदान केंद्रावर दिसले. या अवस्थेत रस्त्याने येत असताना एका व्यक्तीने त्यांनी बाईकने मतदानकेंद्रावर आणून सोडले. तेव्हा ते ओळखपत्र सोबत घेऊन आले. आणि त्यांनी अखेर मतदान केले. आजोबांचा मतदानासाठी हा उत्साह पाहून अनेकजण अचंबित झाले.
आजारी असताना, व्यवस्थित उभंही राहता येत नसताना या अवस्थेत हे आजोबा मतदानासाठी मतदान केंद्रावर आले होते. अनेक जण त्यांच्याकडे कुतुहलाने पाहत होते. ते दुसऱ्यांदा जेव्हा मतदानकेंद्रावर आले तेव्हा तर सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. त्यांचे नाव माहिती नाही, ते कुठे राहतात हे माहिती नव्हते, त्यांना बोलताही येत नव्हते, पण त्यांनी मतदान केंद्रावर येऊन हेच दाखवून दिलं की, आपणच खरे मतदार आहोत. मुंबईत मतांचा आकडा कमी दिसला. अनेक मतदानकेंद्रावर उत्साह पाहायला मिळाला तर अनेकठिकाणी तुरळक प्रमाणात मतदान झालं. उन्हाचा तडाखा, गैरसोय अशा अनेक कारणांमुळे मतदारांना त्रासही झाला. पण तरीही वयोवृद्ध मतदार हा सकाळच्यावेळी मतदानाला आलेला पाहायला मिळाला. आता मुंबईत कोण बाजी मारतं ते पाहणं महत्वाचं आहे.