दीपक भातुसे
मुंबई : मुंबई आणि लगतच्या शहरांमध्ये लोकलचे विस्तीर्ण जाळे असून, लोकलमधून निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात पैशांची अवैध ने-आण होऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन निवडणूक आयोग सावध झाला आहे. मुंबईत राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून तसेच बाहेरील राज्यांमधून दररोज अनेक रेल्वे गाड्या येत असतात. त्यातूनही पैशांची वाहतूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई शहर, उपनगर तसेच मुंबई लगतच्या शहरांमधील रेल्वे स्टेशनवर निवडणूक आयोगामार्फत बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. त्यासाठी पोलिस विभागाबरोबरच रेल्वे सुरक्षा दलाची नेमणूक करण्यात येणार आहे. मतदानाच्या आधीचे चार दिवस हे अतिशय महत्त्वाचे असून, या दिवसांत रेल्वे सुरक्षा दलाची कुमक वाढवली जाणार आहे.
निवडणूक काळात प्रामुख्याने रोकड, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान वस्तूंची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत असते. मतदारांना भुलवण्यासाठी याचा वापर केला जातो. ते रोखण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे अनेक ठिकाणी तपासणी नाके उभारले जातात आणि संशयित वाहनांना थांबवून त्यांची तपासणी केली जाते. रस्ते वाहतुकीमार्फत होणारी पैशांची ने-आण रोखण्यासाठी उपाययोजना आखल्यानंतर आता आयोगाने रेल्वेमार्फत होणारी पैशांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
दुरंतोमधून जप्त केली होती ४० लाखांची रोकड
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात दहा दिवसांपूर्वी ४० लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. नागपूर-दुरंतो एक्स्प्रेसमधून आलेल्या कपड्याच्या पार्सलमध्ये ही रोकड लपवण्यात आली होती.