मतदान केंद्रांवर जा बेस्ट बसने; दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांसाठी नि:शुल्क सेवा, ६०० बस दिमतीला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 09:39 AM2024-05-18T09:39:40+5:302024-05-18T09:42:48+5:30
दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी बेस्ट उपक्रमाची बससेवा देण्यात येणार आहे.
मुंबई : दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी बेस्ट उपक्रमाची बससेवा देण्यात येणार आहे. यासाठी बेस्टकडून ६०० हून अधिक बसगाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या सेवेसाठी मतदारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नसून सध्या पूर्व व पश्चिम उपनगरांतील मतदारांसाठी बेस्ट सेवा उपलब्ध केली जाणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ४० टक्क्यांहून अधिक अपंगत्व असलेल्या दिव्यांग आणि ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘व्होट फ्रॉम होम’ मतदान सुविधा दिली आहे. मात्र, ज्या मतदारांना मतदान केंद्रात जाऊन मतदान करण्याची इच्छा असेल, त्यांच्यासाठी बेस्टची सेवा दिली जाणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदानाच्या दिवशी बस सेवा उपलब्ध केली जाणार आहे. त्यासाठी कोणत्या भागात किती ज्येष्ठ नागरिक आहेत, याची सविस्तर माहिती बेस्ट उपक्रमाला दिली जाणार आहे.
कर्मचाऱ्यांचीही ने-आण-
१) बेस्ट उपक्रमाला माहिती दिलेल्या भागात बेस्टची सेवा सकाळी मतदान सुरू होण्यापासून उपलब्ध केली जाईल.
२) या शिवाय निवडणूक काळात निवडणूक कर्मचाऱ्यांची तसेच पोलिसांची वाहतूक करण्यासाठीही निवडणूक आयोगाकडून बेस्ट बसगाड्यांचा उपयोग होणार आहे.
बेस्ट बस:
१) उपनगर - ३८२
२) शहर - २१२
व्हीलचेअर बस :
१)उपनगर- ३८२
२)शहर - २१२
असे असेल नियोजन -
१) बेस्टकडून शहर विभागात ज्येष्ठ नागरिक मतदार व दिव्यांग मतदार यांना मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी १० लो फ्लोअर बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांना मतदारसंघनिहाय नेमलेल्या दिव्यांग समन्वय अधिकारी यांचे संपर्क क्रमांक देण्यात आलेले आहेत.
२) प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्रांनुसार बेस्ट बस सेवेच्या अधिकाऱ्यांनी रूट मॅप करून दिलेला आहे व त्यानुसार बस थांबे ठरवण्यात आलेले आहेत.
३) या बसचा दिव्यांग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांना लाभ घेता येईल. तसेच लोको मोटर दिव्यांगांसाठी ५ व्हीलचेअरयुक्त लो फ्लोअर बस व त्यासोबत एक सहायक उपलब्ध करून देण्यात येत आहे.
‘तेथे’ १० टॅक्सी उपलब्ध-
१) दिव्यांग मतदार व ज्येष्ठ नागरिकांना मदतीसाठी १३ दिव्यांग मित्र नियुक्त केले आहेत. अरुंद रस्त्यांमध्ये बसेस जाणार नाहीत, अशा ठिकाणी प्रत्येक मतदारसंघनिहाय एक टॅक्सी म्हणजेच एकूण १० टॅक्सी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
२) वरीलप्रमाणे दिव्यांग मतदार व ज्येष्ठ नागरिकांना केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी नियोजन करण्यात आलेले आहे.
३) सध्या बेस्ट उपक्रमाकडे एकूण ३ हजारांपेक्षा जास्त बसगाड्या असून एसी बसही आहेत. यामध्ये ४०० एसी बस दिव्यांगस्नेही असून दिव्यांगांसाठी रॅम्प आहेत. त्यामुळे दिव्यांग उमेदवार व्हीलचेअरसह यामध्ये प्रवेश करू शकतात.
४) मुंबईत २० मे रोजी मतदान होणार आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरांत दिव्यांग मतदारांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे एक दिवस आधी या बस त्या-त्या विभागात उभ्या केल्या जाणार आहेत.