लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता महायुती आणि महाविकास आघाडीचा जोरदार प्रचार सुरू आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी मोठे गौप्यस्फोट केले. "आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून घडवेन अन् दिल्लीला जाईन असं फडणवीस म्हणाल्याचा गौप्यस्फोटही उद्धव ठाकरेंनी यावेळी केला. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या गौप्यस्फोटावर आता भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"उद्धव ठाकरे सातत्याने खोटं बोलत आहेत, ते हताश झाले आहेत. हेच आता त्यांच्या मुलाखतीतून पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. त्यांनी म्हटलंय आदित्य ठाकरेंना देवेंद्र फडणवीस तयार करणार. आता एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपदासाठी तयार करण्यासाठी एक, दोन वर्ष लागतील. आदित्य ठाकरेंची बौध्दीक क्षमता लक्षात घेता एक, दोन वर्ष पुरी होतील अस मला वाटत नाही,अशी टीका भातखळकर यांनी केली.
" याचा अर्थ असा आहे २०१९ च्या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार होते. हे उद्धव ठाकरेंनी त्यावेळी मान्य केलं होतं, तेच ते आज सांगत आहेत. याचा अर्थ २०१९ च्या निकालानंतर मुख्यमंत्रीपद आम्हाला देणार हा दावा होता तो दावा आज उद्धव ठाकरेंनी खोटा पाडलेला आहे. त्यांचा दुसरा दावा मला स्वत:ला मुख्यमंत्री व्हायच नव्हतं. मला शिवसैनिकांना मुख्यमंत्री करायचं होतं.हे सुद्धा त्यांनी खोट पाडलं आहे, त्यांना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं होतं. त्यामुळे २०१९ पासून उद्धव ठाकरे पूर्णपणे खोट बोलत आहेत. हेच आज त्यांच्या मुलाखतीने स्पष्ट झाले आहे, असा टोलाही अतुल भातखळकर यांनी लगावला.