Join us

रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 9:18 AM

अजित पवार गटाचे उमेदवार असलेल्या मतदारसंघांमध्ये तसेच शिंदेसेनेचे उमेदवार असलेल्या मतदारसंघांमध्येही भाजपच्या नेत्यांना पाठविण्यात आले आहे.

मुंबई : ज्या मतदारसंघातील निवडणुका संपल्या त्या मतदारसंघातील भाजपच्या लहान-मोठ्या नेत्यांना आता दुसऱ्या मतदारसंघात पक्षाने ड्यूटी दिली आहे. त्यानुसार जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे.

अजित पवार गटाचे उमेदवार असलेल्या मतदारसंघांमध्ये तसेच शिंदेसेनेचे उमेदवार असलेल्या मतदारसंघांमध्येही भाजपच्या नेत्यांना पाठविण्यात आले आहे. कमळ नाही तिथे मित्र पक्षांच्या विजयासाठी नियोजनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. यातील काही नेते असेही आहेत की ज्यांच्या मूळ मतदारसंघात निवडणूक प्रचार सुरू आहे, पण तेथे मतदान नंतरच्या टप्प्यात होणार आहे. 

महायुतीच्या तीन पक्षांच्या प्रचार यंत्रणेशी समन्वय साधणे, विविध लहान-मोठ्या सभांचे नियोजन करणे, लहान लहान कॉर्नर सभा मोठ्या प्रमाणात होतील हे जातीने पाहणे, दिवसभरात कुठल्या उणिवा जाणवल्या याचे रिपोर्टिंग प्रदेश भाजपला करणे अशा स्वरूपाची कामे त्यांना देण्यात आली आहेत.

एका लोकसभा मतदारसंघासाठी एक निरीक्षक आणि त्यातील सहा विधानसभा मतदारसंघांसाठी प्रत्येकी एक निरीक्षक ठेवण्यात आला आहे. सात मे रोजी तिसऱ्या टप्प्यात ज्या अकरा लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक होत आहे तिथे हे निरीक्षक नेमण्यात आले आहेत.

कुणाकडे कोणत्या मतदारसंघाची जबाबदारी?

रायगड - प्रवीण दरेकर

रत्नागिरी सिंधुदुर्ग - मंत्री रवींद्र चव्हाण

उस्मानाबाद - खा. डॉ. अजित गोपछडे

लातूर - खा. प्रताप पाटील चिखलीकर

बारामती - खा. मेधा कुलकर्णी

कोल्हापूर - धनंजय महाडिक

हातकणंगले - खा. डॉ. अनिल बोंडे

सांगली - केंद्रीय राज्यमंत्री

डॉ. भागवत कराड

सातारा  -विक्रांत पाटील

माढा - प्रसाद लाड

सोलापूर - श्रीकांत भारतीय

टॅग्स :भाजपालोकसभा निवडणूक २०२४