Piyush Goyal News: उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपाकडून पीयूष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसकडून भूषण पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहे. भाजपाने पीयूष गोयल यांची उमेदवारी आधीच जाहीर केली. त्यामुळे पीयूष गोयल यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. तर, दुसरीकडे अलीकडेच भूषण पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसकडून प्रचाराला सुरुवात होत आहे, असे म्हटले जात आहे.
पीयूष गोयल मतदारसंघात अधिक सक्रीय असल्याचे दिसत आहेत. तर नमो रथातून ठिकठिकाणी भेटी देताना दिसत आहे. बोरिवलीत अनेक ठिकाणी नमो रथाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी शाश्वत विकासाचा ध्यास, सोबतीला जनतेचा विश्वास असल्याचे सांगत, उत्तर मुंबईकरांचा नमो रथाला मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी आहे, असे पीयूष गोयल यांनी म्हटले आहे.
मुंबई भाजपाच्या वतीने एक विराट जनसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला मुंबईतून भाजपा उमेदवार असलेले उज्ज्वल निकम आणि पीयूष गोयल उपस्थित होते. मुंबई महाराष्ट्राचीच, जीत भाजपाचीच, असे सांगत विजयाचा विश्वास पीयूष गोयल यांनी बोलून दाखवला. तत्पूर्वी, महाराष्ट्र दिनानिमित्ताने हुतात्मा चौकात जाऊन अभिवादनही केले. जगभरात गतीने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश आहे. भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकाची झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुढील तीन ते साडेतीन वर्षात भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाची होईल. सर्वांनी एकजुटीने देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी संकल्प घ्यायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे देशाला पुढे नेले आहे, त्यात आपले योगदान दिले पाहिजे, असे पीयूष गोयल म्हणाले.
दरम्यान, पीयूष गोयल यांनी उमेदवारी अर्ज भरताना जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपा आणि महायुतीचे आमदार, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्याआधी बोरिवलीत गणपती मंदिरात दर्शन घेऊन पीयूष गोयल यांनी मोठी रॅली काढली होती.