मुंबई : मतदार संघातील विविध सोसायटीत भेटीगाठी सुरू असताना, मंगळवारी भांडुपच्या ड्रिम्स सोसायटीत आयोजित केलेल्या बैठकीत नागरिकांनी महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. प्रचारा ऐवजी प्रश्र्नोत्तरांचा तास रंगलेला दिसून आला.
लोकसभा निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून कोटेचा यांना गृह संकुलांकडून रहिवाशांसोबत संवाद साधण्यासाठी आमंत्रित करत आहेत. कोटेचा भांडुपच्या ड्रिम्स सोसायटीत आले होते. यावेळी नागरिकांनी उमेदवाराकडे विविध कामाबाबत प्रश्न उपस्थित केले. यामध्ये, मेट्रो ४ प्रकल्पाचे काम गतिमान करणे, करोना काळात ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेने दिलेली सवलत, भांडुप - मुलुंड पूर्वेकडील खाडी भागातील तिवरांचे रक्षण, तेथे धारावी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी विरोध, ड्रिमस मॉल आगीत दुकाने भस्मसात होऊनही येणारा प्रॉपर्टी टॅक्स, डम्पिंग ग्राउंड, भांडुप रेल्वे स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडी, या आणि अशा अन्य विषयांवर ड्रिम्स सोसायटीतील रहिवाशांनी कोटेचा यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला
या प्रश्नांवर उत्तर देताना कोटेचा यांनी सांगितले, मुंबईतील मेट्रो प्रकल्पाला जायका(जेआयसीए) ही जपानी कंपनी अर्थ सहाय्य करते आहे. मेट्रो ४ प्रकल्पाचे काम राजकीय अहांकारापोटी तब्बल अडीच वर्षे रखडले होते. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर जपानी कंपनीला हमी, खात्री देत अर्थसहाय्य मिळवून प्रकपाचे काम पुन्हा रुळावर आणण्यासाठी चार महिने लागले. सध्या प्रत्येक दिवशी १० टक्के अतिरिक्त काम सुरू आहे. या मार्गिकेवरील मुलुंड येथील काम पूर्ण होत आले आहे. पवई, गोरेगाव येथून दिला जाणारा जोड तसेच आरे येथील कारशेडचे काम पूर्ण झाले असून ते दोन महिन्यात कार्यान्वित होईल. त्यामुळे ही मार्गिका पुढील १५ महिन्यात सुरू होऊ शकेल.
२०२५ पर्यंत देवनार आणि विक्रोळी येथील डम्पिंगचा करार आहे. धारावी पूर्नवसनाबाबत बोलताना कोटेचा म्हणाले, प्रकल्पबाधितांसाठी सरकारकडे जागेची मागणी झाली हे खरे पण सरकारने जागा दिलेली नाही हेही वास्तव समजून घ्यायला हवे. मुळात मुलुंडचा आमदार या नात्याने धारावी प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनास माझा प्रखर विरोध होता आणि भविष्यातही विरोध कायम राहील, अशी स्पष्टोक्ती कोटेचा यांनी पुन्हा एकदा दिली.