Join us

...अन् तिथे माझ्या सहनशक्तीचा अंत झाला; मुख्यमंत्री शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 11:39 AM

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एका मुलाखतीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत.

Eknath Shinde ( Marathi News ) :  महाविकास आघाडी सरकार काळात माझा प्रत्येकवेळी अपमान होत होता, माझ्या खात्यामध्ये १०० टक्के हस्तक्षेप केला जात होता, असा मोठा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केला. लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी संपला, आता दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्यात प्रचारसभा सुरू आहेत. 

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला विशेष मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. 

फडणवीसांसह चार नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा मविआचा 'प्लॅन' होता; मुख्यमंत्री शिंदेंचा गौप्यस्फोट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमध्ये सतत अपमान झाला. माझ्या खात्यात ठाकरे कुटुंबीयांचा १०० टक्के हस्तक्षेप होता. मी नगरविकास मंत्री होतो, पण मला कधीही स्वतंत्रपणे काम करू दिले नाही, कोणत्याही अधिकाराशिवाय, आदित्य ठाकरेंचा मोठा हस्तक्षेप होता. अनेक वेळा मला ते नगरविकास, एमएमआरडीए, सिडको आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या बैठका बोलावताना आढळले. पक्ष फुटण्यापूर्वी ठाकरे त्यांच्याकडून नगरविकास खाते हिसकावून घेण्याचा विचार करत होते, आदित्य ठाकरे यांच्याकडून सतत अपमान केला जात होता. वर्षावर बोलावून ताटकळत ठेवलं जात होतं, ठाकरे यांचा प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप असायचा. राज्यसभेचा उमेदवार ठरवताना मला सहभागी करून घेतलं नाही या प्रक्रियेपासून दूर ठेवले तेव्हा माझा संयम सुटला, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

"नक्षलवाद्यांचा धोका असूनही मला Z+ सुरक्षा देण्यात आली नाही, असंही शिंदे म्हणाले. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याच्या मार्गात मी अडथळा ठरेन, असे त्यांना वाटत होते, असा गौप्यस्फोटही शिंदे यांनी केला.

भाजपा नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा प्लॅन

 देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचं कटकारस्थान  मविआ सरकारने आखलं होतं, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी हल्लीच केलाय. माझ्या माहितीप्रमाणे महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर असताना केवळ देवेंद्र फडणवीसच नाही तर गिरीश महाजन, आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांच्याविरोधात खटले उभे करून त्यांना अटक करून तुरुंगात टाकण्याचा कट महाविकास आघाडी सरकारने आखला होता. एवढंच नाही तर २०२४ च्या निवडणुकीपूर्वी भाजपाच्या आमदारांना फोडून आपल्याकडे वळवण्याचा डावही आखण्यात आला होता, असा सनसनाटी गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

टॅग्स :एकनाथ शिंदेशिवसेनाउद्धव ठाकरेआदित्य ठाकरेलोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४