मुंबई : उद्धव ठाकरे यांना या आधीच आम्ही क्लीन बोल्ड केले आहे. त्यामुळे मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये महायुतीच विजयाचा षटकार मारणार. राज्यात शिंदे १५ जागा जिंकणार, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी व्यक्त केला.
शिंदेसेनेचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर मुंबईतील उमेदवार राहुल शेवाळे, रवींद्र वायकर, यामिनी जाधव यांच्या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री शिंदे यांनी मतदारसंघात बैठक घेतली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, लोकांनी ही निवडणूक हाती घेतली आहे. माझ्यापेक्षाही अधिक अनुभव मुंबईतील पदाधिकाऱ्यांना असून निवडणुकीच्या अनुषंगाने काय तयारी करता येईल, यावर सविस्तर चर्चा झाली. मुंबईतील सहा जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे. विरोधकांना आम्ही क्लीन स्विप देण्याचा निर्धार केला आहे. एवढेच नव्हे, तर ठाणे, कल्याण-डोंबिवलीची जागाही आम्ही जिंकणार आहोत, असे ते म्हणाले.
मुंबईत मोदींच्या भव्य सभा
पंतप्रधान मोदी यांनी यांनी मुंबईत सभा घ्याव्यात, अशी मागणी आम्ही करणार आहोत. त्यांचेही मुंबईवर विशेष प्रेम आहे. त्यामुळे त्यांच्या भव्य सभा या ठिकाणी होतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दोन दिवसांत निरुपमांचा प्रवेश
उत्तर पश्चिम मुंबईतून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले संजय निरुपम हे शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत. ते आपल्याला भेटून गेले आहेत. दोन दिवसांत त्यांचा प्रवेश होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
टीकांकडे लक्ष देऊ नका
समोरचे टीका करत राहणार, पण तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही विकासाचा मुद्दे सगळ्यांसमोर मांडा. लोकसभा निवडणुकीत ‘विकास’ हाच आपला अजेंडा असला पाहिजे. महाराष्ट्रातील इतर भागातील निवडणुका आता पूर्ण झाल्या आहेत, त्यामुळे तिथल्या आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची व्यवस्था मुंबईमध्ये करा, त्यांची मुंबईसाठी मदत घ्या, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीत केल्या.