वाहन खर्चाची लपवाछपवी आता चालणार नाही; एका तासाला साडेचार हजारांपर्यंत खर्च!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 11:05 AM2024-05-14T11:05:56+5:302024-05-14T11:09:15+5:30
निवडणुकीच्या काळात एका वाहनाचा खर्च तासाला १२० रुपयांपासून ४ हजार ७०० रुपयांपर्यंत करता येऊ शकतो.
मुंबई : निवडणुकीच्या काळात एका वाहनाचा खर्च तासाला १२० रुपयांपासून ४ हजार ७०० रुपयांपर्यंत करता येऊ शकतो. मात्र, मोठा मतदारसंघात प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे हे वाहनाशिवाय शक्य नाही. कारण निवडणूक आयोगाचे प्रत्येक उमेदवारावर असलेले बारीक लक्ष पाहता वाहन खर्चाची लपवाछपवी करणे त्यांना शक्य होणार नाही.
उन्हात पायी पोहोचणे अशक्य-
साडेसतरा लाखांची लोकसंख्या असलेल्या उत्तर पश्चिम विभागात फिरण्यासाठी वातानुकूलित वाहने असणे आवश्यक आहे. कारण उन्हाचा चढता पारा पाहता दिवसा चालत मतदारांपर्यंत पोहोचणे अशक्य आहे, असे लिडिंग पार्टीच्या एका उमेदवाराने सांगितले
वाहन प्रतिदिवस खर्च (अंदाजे)-
जीप ४०००
तवेरा ४५००
एसी टॅक्सी ३०००
साधी टॅक्सी २७००
ट्रक ८०००
रिक्षा २५००
सुमो ४५००
‘व्हिडीओ सर्व्हेलन्स आणि नोंदवही -
उमेदवारांच्या बैठका, कोपरा सभा, रॅली अशा प्रत्येक ठिकाणी प्रशासनाचे ‘व्हिडीओ सर्व्हेलन्स’ पथक खर्चावर लक्ष ठेवणार आहे. याखेरीज ‘व्हिडीओ व्हिविंग’ पथक (व्हीव्हीटी), खर्च निरीक्षकदेखील उमेदवाराने सादर केलेला खर्च आणि पथकाने नोंदविलेला खर्च याची पडताळणी करणार आहेत. माहिती सादर न करणाऱ्या उमेदवारांवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
१) निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एक कप चहासाठी सहा रुपये, तर कॉफीसाठी १२ रुपये कप दर निश्चित केला आहे.
२) वडापावसाठी १२ रुपये, तर भजी, पोहे, कचोरी, फरसाणसाठी साधारण १५ ते २० रुपये दर निश्चित केले आहेत. एकवेळचे शाकाहारी जेवण १५० रुपये, तर मांसाहारी थाळीसाठी २५० रुपये दर निश्चित केला आहे.
३) तसेच पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या कंपनीने जाहीर केलेल्या किमतीवर खरेदी करता येतील.