मुंबई - Naseem Khan ( Marathi News ) मी पदासाठी काम करत नाही. काँग्रेसच्या विचारधारेसाठी काम करतोय. मी गांधी-नेहरू यांच्या नेतृत्त्वाखाली काम करत राहीन, हीच माझी भूमिका आहे असं सांगत नसीम खान यांनी प्रचार समितीचा राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. काँग्रेसनं मुंबई उत्तर मध्य येथून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिल्याने नसीम खान नाराज होते. त्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची समजूत काढली आणि आता नसीम खान यांची नाराजी दूर झाल्याचं स्पष्ट होत आहे.
नसीम खान यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी वर्षा गायकवाड यांचा प्रचार करणार आहे. जिथे आघाडी असते तिथे जागावाटपात थोडीफार नाराज असते. उत्तर पश्चिम मुंबईची जागा मित्रपक्षाला गेली त्यामुळे निरुपम नाराज झाले, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. परंतु त्यावर अधिक भाष्य करायचं नाही. माझ्याबाबत जी चर्चा ती दिशाभूल करण्याची होती. काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी असल्याची बातमी पसरवली गेली. एमसीएच्या बैठकीत भाई जगपात, चंद्रकांत हंडोरे या सर्वांनी नाराजी दूर करण्यासाठी माझी समजूत काढली. या बैठकीनंतर माझी नाराजी दूर झाली होती असं त्यांनी म्हटलं.
तसेच कार्यकर्त्यांची भावना वरिष्ठांपर्यंत पोहचावी यासाठी मी पत्र लिहिलं होते. या पत्राची हायकमांडने दखल घेतली. माझी सर्वांशी चर्चा झाली, मी जो समाजाच्या वतीने मुद्दा मांडला त्याची गंभीर दखल घेऊन आगामी काळात याची भरपाई करण्याचं काम पक्षाच्या वतीने करू असं आश्वासन मला देण्यात आले. मी पक्षातील कार्यकर्ता असून जिथे त्रुटी असेल ती दूर करण्याचं माझं कर्तव्य आहे. पक्षश्रेष्ठींनी माझ्या मागणीची दखल घेतली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे असं नसीम खान यांनी सांगितले.
दरम्यान, राहुल गांधी देश वाचवण्यासाठी जो लढा देतायेत, त्यात सर्वांनी सहभागी व्हावे. संविधान बदलण्याचा जो कट रचला जातोय. देशातील शेतकरी, बेरोजगार यांना न्याय देण्यासाठी काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीच्या माध्यमातून सर्व एकजूट होऊन लढा देतायेत. या लढाईतून इंडिया आघाडीचा पंतप्रधान देशात व्हायला हवा यासाठी आम्ही सर्व कामाला लागणार आहोत असंही नसीम खान यांनी सांगितले आहे.