मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी पार पडलं. अत्यंत उत्साहाने लोक मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडले होते. मात्र अनेक ठिकाणी मतदारांची गैरसोय झाल्याचं चित्र समोर आलं. मतदारांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. याच घडामोडीत वरळीतील एका शिवसैनिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा मृत्यू म्हणजे निवडणूक आयोगाच्या गैरव्यवस्थेचा बळी आहे असा आरोप शिवसेना उबाठा गटाचे नेते अरविंद सावंत यांनी केला आहे.
अरविंद सावंत म्हणाले की, मनोहर नलगे हा आमचा शिवसैनिक पोलिंग एजेंट म्हणून काम करत होता. तो दिवसभर मतदान केंद्रात होता. मतदान संपता संपता तो नैसर्गिक विधीसाठी गेला. मात्र तो परत आला नाही. त्याचा शोध घेतला असता शौचालयात तो बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला तातडीने उपचारासाठी केईम हॉस्पिटलला आणलं. परंतु याठिकाणी त्याला मृत घोषित केला. इतकी घाणेरडी व्यवस्था माझ्या ५० वर्षाच्या कारकिर्दीत मी कधीच पाहिली नाही जेवढी यावेळी निवडणूक आयोगाने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी केली असं त्यांनी म्हटलं.
मतदान केंद्रात कर्मचाऱ्यांचे हाल झाले. सकाळी १० वाजता तिथल्या एका कर्मचाऱ्याला नायर हॉस्पिटलला न्यावे लागले. पंखे नाहीत, दिवे नाहीत, व्हेंटिलेशन नाही असे वर्ग होते. बाहेर लोक उन्हातान्हात उभे आहेत. प्यायला पाणी नाही. इतकी वाईट अवस्था मतदान केंद्रावर होती. त्यामुळे हा त्या गैरव्यवस्थेचा बळी आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही या असुविधेचा त्रास झाला. एका निष्ठावंत शिवसैनिकाचा अशाप्रकारे अंत व्हावा हे दु:खदायक आणि क्लेशदायक आहे असं अरविंद सावंत यांनी सांगितले.
दरम्यान, मनोहर नलगे हे आमचे ज्येष्ठ शिवसैनिक साधारण ६१-६२ वर्षाचे असतील. संपूर्ण कुटुंबीय शिवसेनेसोबत होते. या लोकांनी कधी आमच्याकडून पदाची आणि लाभाची अपेक्षा केली नाही. स्वत:हून लोकांच्या घरोघरी जात प्रचार करणार. या निवडणुकीत जी गैरव्यवस्था होती. महापालिकेच्या शाळांचे वर्ग तुम्ही घेतले, पाण्याची व्यवस्था नव्हती. पंखे दुरुस्त नव्हते. मतदारांसह कर्मचारी आणि अधिकारीही वैतागले असते. गैरव्यवस्थेमुळे हा हकनाक बळी गेला अशी प्रतिक्रिया आमदार सुनील शिंदे यांनी व्यक्त केली.